बामणे प्राथमिक शाळेत.- शालेय मंत्रिमंडळ निवडणुकीत १००% मतदान. ( क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले शाळा विकास आघाडीच्या सर्व १३ उमेदवारांनी मारली बाजी.)
बामने.- वार्ताहर.

भुदरगड तालुक्यातील बामने येथील विद्या मंदिर बामणे या प्राथमिक शाळेत “शालेय मंत्रिमंडळ” निवडणुक २०२३-२४ सालाकरिता ही प्रक्रिया लोकशाही गुप्त मतदान पद्धतीने दि ८ रोजी उत्साहात संपन्न झाली.
यावेळी पहिली ते सातवीच्या विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी १००% मतदानाचा हक्क बजावला. लोकशाही मूल्यांची जागरूकता रुजवणुक व लोकशाही पद्धत प्रत्यक्षरित्या अनुभवण्यासाठी मतदान पत्रिकेवर मतदान करण्याचे सदर उपक्रमाचे आयोजन म्हणजे या उपक्रमातील प्रमुख उद्देश होता.
तत्पूर्वी सोम. दि ४ पासून अर्ज भरणे, माघार घेणे, चिन्ह वाटप, पॅनल तयार करणे, प्रचार करणे या प्रक्रिया नियोजनानुसार पूर्ण केल्या. श्री शिव शाहू शाळा विकास आघाडी व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले शाळा विकास आघाडी या दोन तुल्यबळ गटात मोठ्या चुरशीने मतदान झाले. यात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले शाळा विकास आघाडी च्या सर्वच्या सर्व १३ उमेदवारांनी बाजी मारली. आणि मुख्यमंत्री पदासह सर्व मंत्रीपदावर या गटाने विजय मिळवला. व ज्या आघाडीतुन विजय झाला त्याच आघाडीत वर्षभर राहण्याची शपथ विजयी आघाडीकडून घेण्यात आली. विजयी आघाडीने गुलालाला फाटा देत विरोधी आघाडीला सोबत घेऊन आनंद उत्सव साजरा करत राष्ट्रगीताने आरंभ केला.
या उपक्रमास विद्या मंदिर बामणे शाळेचे कार्यतत्पर मुख्याध्यापक अशोक भांदिगरे यांचे मार्गदर्शन लाभले. मतदान प्रक्रिया सुरु असतानाच केंद्रप्रमुख विठ्ठल मगदूम यांनी सदर उपक्रमास सदिच्छा भेट दिली. या उपक्रमाचे नियोजन विषयशिक्षक दिलीप सुतार यांनी केले. व अध्यापक शशिकांत पाटील, अजित माने व रुपाली सुतार यांचे सहकार्य लाभले. सदर उपक्रमास माता – पालकांनी प्रत्यक्ष भेट देऊन उपक्रमाचे कौतूक केले.
तसेच या प्रक्रियेत शाळा व्यवस्थापन समिती, पालक, ग्रामस्थ व ग्रामपंचायत बामणे यांचे सहकार्य लाभले. या उपक्रमाबद्दल ग्रामस्थांकडून कौतुक करण्यात आले.
