HomeUncategorized…तर चुकीला माफी नाही ! पोलीस आयुक्तांचा कारवाईतून इशारा.- पोलीस आयुक्त रितेश...

…तर चुकीला माफी नाही ! पोलीस आयुक्तांचा कारवाईतून इशारा.- पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी आयुक्त म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर पहिल्याच बैठकीत प्रतिक्रिया

तर चुकीला माफी नाही !
पोलीस आयुक्तांचा कारवाईतून इशारा.

मुंबई.- प्रतिनिधी.

पोलीस ठाण्यात आलेला साधा तक्रार अर्ज असो वा अदखलपात्र गुन्हा. संबंधित पोलीस ठाण्यातील प्रमुख आणि जबाबदार अधिकाऱ्यांनी वेळीच त्याची दखल घेऊन प्रतिबंधात्मक करवाई केल्यास भविष्यातील घटना टळू शकतील.त्यामुळे आलेल्या तक्रारीची तत्काळ दखल घेऊन प्रतिबंधात्मक, प्रसंगी कठोर कारवाई करा अन्यथा होणाऱ्या परिणामांना सामोरे जा, असा सज्जड इशाराच पोलीस आयुक्तांनी आपल्या कारवाईतून दिला आहे.

आयुक्तांनी सहकारनगर, वारजे पोलीस ठाण्यातील वरिष्ठ निरीक्षकासह अधिकारी, कर्मचाऱ्यांना निलंबित केल्यानंतर शहरात एकच खळबळ उडाली असून ठाणे प्रभारींनी याची चांगलीच धास्ती घेतली आहे.तर गेल्या काही दिवसात शहरात गुन्हेगार आणि गुन्हेगारी टोळ्यांनी मोठ्या प्रमाणात धुडगूस घातला आहे. विशेषत: सहकारनगर, वारजे या भागात वाहनांची तोडफोड आणि दिवसाढवळ्या फायरींगची घटना घडली. या भागात सातत्याने घडणाऱ्या घटनांच्या पार्श्वभूमीवर आयुक्त रितेश कुमार यांच्या सूचनेनुसार वारजे, सहकारनगर, भारती विद्यापीठ, सिंहगड, स्वारगेट आणि दत्तवाडी पोलीस ठाण्यावर स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेची पथके तैनात करण्यात आली. रात्री उशिरापर्यंत येथे गस्त घालून रेकॉर्डवरील गुन्हेगाराची तपासणी, पाहिजे आरोपींचा शोध घेण्यात येत होता. मात्र, ही कारवाई सुरू असतानाच टोळक्याने धुडगूस घालत वाहनांची तोडफोड केली. तसेच, येथील काही घरांवर दगडफेक करण्यात आली. यामुळे संतप्त झालेल्या आयुक्तांनी थेट सहकारनगर वरिष्ठ पोलीस निरीक्षकाची नियंत्रण कक्षात बदली केली. मात्र, सहकारनगर परिसरातील तोडफोड आणि दगडफेकीच्या घटना घडण्यापुर्वी याबाबत चार अदखलपात्र (एनसी) गुन्हे दाखल करण्यात आले होते. परंतू तत्कालीन पोलिस निरीक्षक आणि त्यांच्या अधिकारी,कर्मचार्‍यांनी त्याची गंभीर दखल घेतली नाही. त्यामुळे पुढील काही दिवसात दोन गटात वाद झाल्यानंतर कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाली. यानंतर या घटनेचे तीव्र पडसात उमटले. जर सुरुवातीलाच तक्रारींची गांभिर्याने दखल घेऊन प्रतिबंधात्मक बरोबरच कठोर कारवाई केली असती तर हा प्रकार घडला नसता, असे निरीक्षण नोंदवत वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्यासह इतरांना थेट सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. पोलीस आयुक्तांनी एकाचवेळी केलेली ही आजवरची सर्वात मोठी कारवाई समजली जाते. तोडफोड, कोयता आणि दहशतीच्या घटना घडता कामा नये. वारंवार असे प्रकार एखाद्या पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडत असतील तर त्याची गंभीर दखल घ्या अन्यथा नियंत्रण कक्ष अथवा निलंबनाची कारवाई अटळ आहे, असा इशाराच आयुक्तांनी या कारवाईतून दिला आहे.

31 टोळ्यांवर मोक्का.- 24 जण स्थानबद्ध.

पोलीस आयुक्तांनी सूत्रे हाती घेतल्यापासून शहरातील 31 गुन्हेगारी टोळ्यांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत (मोक्का) कारवाई करण्यात आली आहे. तर, सातत्याने गुन्हे करणाऱ्या 24 सराईत आरोपींना एम.पी.डी.ए अंतर्गत स्थानबद्ध करण्यात आले आहे. गेल्या सहा महिन्यात जवळपास 14 हजार 400 आरोपींवर वेगवेगळ्या कलमान्वये कारवाई केलेली आहे.

पहिल्या बैठकीपासूनच सूचना

पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी आयुक्त म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर पहिल्याच बैठकीत वॉन्टेड, रेकॉर्डवरील आरोपी आणि प्रतिबंधात्मक कारवाई यावर भर देण्याच्या सूचना केल्या होत्या. तेव्हापासून वेळोवेळी अशा सूचना केल्या जात आहेत. मात्र, काही पोलीस ठाणे प्रभारींकडून याकडे दुर्लक्ष केले जाते. गुन्ह्यातील सराईत आणि फरार आरोपींना पकडुन वेळीच कारवाई केली नाही तर त्यांच्याकडून भविष्यात मोठा गुन्हा घडण्याची शक्यता असते. त्यामुळे यावर आता विशेष लक्ष दिले जाणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.