महामार्गच्या वरिष्ठांची अनुपस्थिती – सक्षम अधिकाऱ्यासोबत पुन्हा बैठकीची मागणी
( शिवसेना पदाधिकाऱ्यांचा बैठकीतून काढता पाय.)
आजरा.- प्रतिनिधी.

आजरा येथील १६०: संकेश्वर ते बांदा महामार्गाच्या पावसाळ्यातील कामाच्या नियोजनाची माहीती मिळावी यासाठी तहसीलदार कार्यालयाच्या सभागृहात तहसीलदार यांनी राष्ट्रीय महामार्ग, कंपनीचे अधिकारी आणि ठेकदार यांच्यासोबत बैठक बोलावली होती. पण सदर बैठकीला तहसीलदार समीर माने कामानिमित्त बाहेर गेल्याने स्वतः गैरहजर होते. या बैठकीला महामार्गाचे वरिष्ठ अधिकारी अनुपस्थित राहील्याने झालेल्या चर्चेवर नियोजन होणार नाही असे सांगत शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी बैठकीतून काढता पाय घेतला. पुन्हा बैठक बोलवण्याची मागणी केली. निवासी नायब तहसीलदार म्हाळसाकांत देसाई अध्यक्षस्थानी होते. संकेश्वर ते बांदा महामार्गाच्या कामाचे पावसाळ्यातील नियोजन सांगा अशी मागणी शिवसेना उध्दव ठाकरे गटाने केली होती. त्या अनुषंगाने तहसीलदार श्री. माने यांनी बैठक बोलावली होती. आजरा तालुक्यात संकेश्वर ते बांदा या महामार्गाचे काम वेगाने सुरु आहे. यामुळे आजरा ते किटवडे पर्यंतचा रस्ता उखडून टाकला आहे. पावसाळा तोंडावर आहे. पाऊस सुरु झाल्यास या मार्गावर अपघात वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे या कामाचे नियोजन सर्वांना समजावे याबाबत बैठक होती. बैठकीला प्रोजेक्टचे उपव्यवस्थापक हरी आम महामार्ग शाखा अभियंता अनिल पाटील उपस्थित होते. मारुती डोंगरे म्हणाले, गवसे येथील मराठी शाळेच्या प्रवेशद्वाराला लागून महामार्ग जातो. शाळेत जाणाऱ्या लहान मुलांनी महामार्ग ओलांडून शिक्षण कसे घ्यावे ? त्यासाठी स्काय वॉक उभा करावा. त्याचबरोबर शेतकन्यांच्या जमिनीतून रस्ता घालून अधिकारी धाकघपटशाही करीत आहेत. असा आरोपही केला. आजरा चंदगड शिवसेनेचे संपर्क प्रमुख व आजरा साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रा. सुनिल शिंत्रे म्हणाले, या ठिकाणी कोणाही सक्षम अधिकारी समाधानकारक उत्तर देण्यासाठी उपस्थित नाही. तहसीलदारही उपस्थित नाहीत त्यामुळे चर्चा निष्फळ होणार आहे. सक्षम अधिकारी व महामार्गाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यासमोर बैठक लावावी अशी मागणी केली. याला उपजिल्हा संघटक संभाजी पाटील, तालुका प्रमुख युवराज पोवार यांनी दुजोरा दिला. पदाधिकाऱ्यांनी बैठकीतून काढता पाय घेतला. गडहिंग्लज तालुका प्रमुख दिलीप माने, भुदरगड तालुका प्रमुख प्रकाश पाटील, दिनेश कांबळे, सुनिल डोंगरे, राजकुमार भोगण, आमकार मायाळकर, गणपतराव डोंगरे, दत्तात्रय मोहीते, मानसिंग देसाई, अनंत मोरजकर, प्रकाश हरमळकर उपस्थित होते.
चौकट.
शिवसेनेने दिलेल्या निवेदनाची दखल घेऊन तहसीलदार यांनी बैठकीचे आयोजन करून संबंधित महामार्ग अधिकारी यांना सूचना दिल्या असताना देखील जबाबदार अधिकारी व स्वतः तहसीलदार देखील सदर बैठकीला उपस्थित न राहिल्याने शिवसेनेच्या पदाधिकारी सक्षम जबाबदार अधिकारी बोलवा मगच आमच्या प्रश्नाचे उत्तर द्या. असे सांगून बैठकीतून काढता पाय घेतला.
