‘नासा’च्या नावाने ६ कोटींची फसवणूक. – ४ जणांनी २५० हून अधिक पुणेकरांना लावला चुना.
पुणे :- प्रतिनिधी.
पुण्यात ४ जणांच्या टोळक्याने २५० हून अधिक पुणेकरांना नासा, इस्रो मध्ये वापरत असलेल्या राइस पुलर यंत्राच्या विक्रीतून भरपूर मालामाल व्हाल असे सांगत फसवणूक केल्याची घटना घडली आहे.नासा, इस्रो, यासारख्या संशोधन संस्थांमध्ये वापरल्या जाणाऱ्या धातूच्या व्यवसायात गुंतवणूक करून मोठा लाभ मिळवण्याचे आमिष दाखवून ४ जणांनी फसवणूक केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे स्टेशन परिसरात एका हॉटेलमध्ये ४ जणांनी गुंतवणूकदारांसाठी बैठक बोलावली होती. त्यात एका मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. अमेरिकेच्या संशोधन संशोधन संस्था ‘नासा’ मधील लोक भारतात येणार आहेत असे सांगण्यात आले.यावेळी शास्त्रज्ञ राइस पूलर या यंत्रावर संशोधन होणार असल्याचे सांगण्यात आले. राइस पूलर या धातुच्या भांड्याला मागणी संपूर्ण जगात असल्यामुळे आरोपींनी गुंतवणूकदारांना १ लाख गुंतवले तर १ कोटी मिळतील अशी बतावणी केली. त्यानंतर त्या चौघांनी बनावट कागदपत्रे तयार करून नागरिकांकडून पैसे जमा केले.काही कालावधीनंतर कागदपत्रे बनावट असल्याचे उघड झाले आहे. यात पुण्यातील २५० हून अधिक लोकांची जवळपास ६ कोटी रुपयाची फसवणूक झाल्याची माहिती पोलिस उपायुक्त (आर्थिक गुन्हे शाखा) श्रीनिवास घाडगे यांनी दिली.
या प्रकरणी राम गायकवाड, रामचंद्र वाघमारे, संतोष सकपाळ, राहुल जाधव यांच्या विरोधात पोलिसांनी (Police) गुन्हा दाखल केला आहे. बंडगार्डन पोलिस ठाण्यात या सगळ्यांच्या विरोधात भारतीय दंडात्मक कलम ४०६, ४२०, ४६७, ४६८, ४७१, १२० (ब) व ३४ सह महाराष्ट्र ठेवीदारांचे हित रक्षण अधिनियम ३,४,५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आर्थिक गुन्हे शाखेकडून या सगळ्यांचा शोध सुरू केला आहे. तसेच पथकं देखील तयार करण्यात आली आहेत.
