कोरोना आपत्ती:-
राज्यात ५ जिल्ह्यांमध्ये कडक लॉकडाऊन तर नागपुरमध्ये आढळला नवा डबल स्ट्रेन
कोल्हापूर. प्रतिनिधी. ०४ मे.
राज्यात कोरोना महामारीचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढतच आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यातील पाच जिल्ह्यांमध्ये कडक लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. यात सांगली, सातारा, कोल्हापूर, बारामती आणि अहमदनगर जिल्ह्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे यात किराणा, फळे, भाजीपाला, बेकरी, डेयरी, मिठाई आणि खाद्यपदार्थांची दुकानेही येत्या 7 दिवसांसाठी बंद राहणार आहे. हा लॉकडाऊन आज (मंगळवार) सकाळी सात वाजेपासून सुरु होणार असून 10 मे च्या रात्री बारा वाजेपर्यंत लागू राहणार आहे.
राज्याची उपराजधानी नागपुर शहरात कोरोना व्हायरसचे डबल म्यूटंट आढळले आहे. दरम्यान, दिल्लीहून मिळलेल्या अवहालानुसार, 74 सॅम्पलमधील 35 सॅम्पलमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे 5 नवे स्ट्रेन आढळल्याचे समोर आले आहेत. तर इतर 26 सॅम्पलमध्ये डबल म्यूटेशन असल्याचे इंदिरा गांधी मेडिकल कॉलेजमधील मायक्रो बायोलॉजी विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. रवींद्र खडसे यांनी सांगितले. विशेष म्हणजे सर्दी, खोकला आणि ताप या स्ट्रेनचे नवीन लक्षण आहेत. हे सॅम्पल नागपूर येथील इंदिरा गांधी मेडिकल कॉलेज आणि नागपूर मेडिकल कॉलेजमध्ये आलेल्या संशयित रुग्णांचे असून एनआयव्ही पुणे आणि एनसीडीसी दिल्ली येथे तपासणी करीता पाठवण्यात आले होते.
गेल्या चोवीस तासांत सांगली जिल्ह्यात 1 हजार 568 कोरोनाचे नवीन रुग्ण आढळून आले असून यामध्ये 40 लोकांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, राज्याचे जलसंसाधन मंत्री आणि सांगलीचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी एका आठवड्यासाठी लॉकडाऊन घोषीत केला आहे. या संदर्भात त्यांनी आपल्या सोशल मीडिया हँडलवरुन एक व्हिडियो शेअर केला आहे.
