महिलेच्या मृत्यूनंतर माहेरवासीय आक्रमक.- देवर्डे येथे विहीरीत सापडला होता मृतदेह
आजरा. – प्रतिनिधी.
देवर्डे (ता. आजरा) येथे सौ. दिपा दिगंबर पाटील या महीलेचा मृतदेह विहीरीत सापडला. गुरुवारी सायंकाळी घडलेल्या या घटनेची आजरा पोलीसात नोंद झाल्यानंतर पोलीसांनी स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह पाण्याबाहेर काढून तो आजरा ग्रामिण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला. दरम्यान सौ. दीपा यांच्या मृत्यूची बातमी सुपे (ता. चंदगड) येथील माहेरी समजल्यानंतर रात्री उशीरा मोठ्या संख्येने सुपे येथून आलेल्या नातेवाईकांनी आक्रमक भूमिका घेतली. मृत्यबाबत संशय व्यक्त करत प्रथम मृत्यूचे कारण स्पष्ट होवू देत त्यानंतर मृतदेहावर अंतिम संस्कार करावेत अशी भूमीका घेत मृतदेह ताब्यात घेण्यास मज्जाव केला.
सकाळी सदर प्रकार स्थानिक पोलीस प्रशासनाच्या लक्षात आल्यावर तातडीने सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनिल हारुगडे तहसीलदार विकास अहिर, निवासी नायब तहसीलदार डी.डी. कोळी यांच्यासह अधिकारी व कर्मचारी यांनी आजरा ग्रामिण रुग्णालयात धाव घेतली. या वेळी सौ. दीपा यांच्या माहेरच्या नातेवाईकांना समजावून सांगण्याचा प्रयत्न झाला. मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट करा असा माहेरवासियांकडून स्थानिक वैदयकिय अधिकाऱ्यांकडे आग्रह करण्यात आला. अखेर माजी वैदयकिय अधिक्षक डॉ. अशोक फर्नाडीस यांना बोलावण्यात आले.
उपस्थितासह अधिकारी वर्गाशी त्यांनी चर्चा करून सदर शवविच्छेदनाचा व्हिसेरा राखून ठेवला असून पुणे येथील वैदयकिय प्रयोगशाळेत पाठवल्यानंतर त्यांचा अहवाल येईल व त्यानंतर मृत्यूचे नेमके कारण समजू शकेल असे स्पष्ट केले. वरिष्ठ अधिका-यांच्या मध्यस्थीनंतर सुपे येथील ग्रामस्थांनी मृतदेह ताब्यात घेण्यास सहमती दर्शवली.
या वेळी मोठ्या संख्येने देवर्डे व सुपे येथील ग्रामस्थ एकत्र आल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.