पेरणोलीत वरेकर कुटुंबाने दिला वडिलांच्या दिवसकार्यात कर्मकांडाला फाटा.
आजरा. – प्रतिनिधी.
शिक्षक पती पत्नी व छायाचित्रकार असलेल्या कुटुंबाचा नवा आदर्श
आजरा : पेरणोली ता आजरा येथील नारायण लक्ष्मण वरेकर यांचे १०४ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या बाराव्या दिवसकार्यात पुरोहिताला न बोलवता कर्मकांडाला फाटा देत केवळ प्रतिमा पूजनाने दिवसकार्य करून त्यांची मूले,सून व नातवंडांनी समाजात नवा आदर्श निर्माण केला. येथील शिक्षक पती- पत्नी मारूती वरेकर, जयश्री वरेकर व छायाचित्रकार कृष्णा वरेकर,वैशाली वरेकर या कुटुंबाने दिवसकार्यात कोणतही कर्मकांड न करण्याचा निर्णय घेतला. त्याप्रमाणे नदीकाठावर पुरोहिताच्या हस्ते विधी न करता कष्ट करून जीवन जगणाऱ्या नातेवाईकांना सोबत घेऊन अस्थींचे विसर्जन केले घरात कुटुंब,नातेवाईक व शेजारील महिलांच्या हस्ते प्रतिमा पूजन करुन अभिवादन करण्यात आले.कर्मकांडामूळे अर्थिक व मानसिक शोषण होत असल्यामूळे पेरणोली येथील अनेक कुटुंबांनी पुरोहिताला फाटा देत नातेवाईकांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्याची परंपरा सुरू केली आहे. तोच वारसा वरेकर कुटुंबाने सुरू ठेवल्याने सर्वत्र कौतुक होत आहे.