कापसाचे एक बोंड देखील न पिकविणारी इचलकरंजी वस्त्रोद्योगाचे मँनेस्टरनगरी कशी बनली ? – पहा तर –
इचलकरंजी ही घोरपडे संस्थानची
जहागीर.मराठेशाहीच्या काळापासून हे गाव प्रसिद्ध
इचलकरंजी. – वृत्तसंस्था- सौजन्य.
इचलकरंजी हे पश्चिम महाराष्ट्रातील एक प्रमुख शहर.पंचगंगा नदीच्या तीरावर ऊस,भाजीपाला पिकवणारं एक संपन्न गांव.महाराष्ट्रातला दुसरा सहकारी साखर कारखाना इथे सुरु झाला.या गावात एकाही शेतात कापूस पिकत नाही,पण तरीही संपूर्ण देशात इथला टेक्स्टाईल उद्योग प्रसिद्ध आहे.
कारण काय असेल?
इचलकरंजी ही घोरपडे संस्थानची
जहागीर.मराठेशाहीच्या काळापासून हे गाव प्रसिद्ध आहे. सरसेनापती संताजी घोरपडे यांनी एका हुशार ब्राह्मण मुलाला आपल्या राज्यात आश्रय दिला.त्या मुलाने म्हणजेच नारो महादेव जोशी यांनी इचलकरंजी संस्थान स्थापन केले.
संताजी घोरपडेंचे उपकार लक्षात ठेवण्यासाठी नारो महादेव यांनी घोरपडे हे आडनाव स्वीकारले.
पुढे पेशवाई मध्ये इचलकरंजी हे संस्थान प्रसिद्धीस आले.
बाजीराव पेशव्यांची लाडकी बहिण अनुबाई या घोरपडेंना दिली होती.अखेर पर्यंत तिच्या शब्दाला पेशव्यांच्या दरबारात मान होता.पार पोर्तुगीजांच्या गोव्यापर्यंत इचलकरंजीकर घोरपड्यांनी आपली तलवार गाजविली होती.
पण इचलकरंजीचे भाग्यविधाते ठरले श्रीमंत नारायणराव बाबासाहेब घोरपडे
१८९२ साली श्रीमंत नारायणराव बाबासाहेब इचलकरंजीच्या गादीवर बसले.ते स्वतः पदवीधर होते,नव्या विचारांचे पुरस्कर्ते होते.इंग्लंडला जावून आल्यामुळे त्यांच्या विचारसरणीला नव्या बदलत्या काळाचा स्पर्श झाला होता.
आपल्या जहागिरीमध्ये या नव्या विचारांचे रोपण व्हावे म्हणून त्यांनी अथक प्रयत्न केले.
गावांत शाळा सुरू केल्या, काँलेजला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना स्कालरशिप सुरू केली.ग्रंथालय स्थापन केले, महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्यापासुन ते रँग्लर ग.स.महाजनी यांच्यापर्यत अनेक विद्वानांना व्याख्यानासाठी गावांत आणलं.
गायन,वादन,नृत्य,नाटक या कलांना प्रोत्साहन तर दिलेच शिवाय संस्थानातील शेतकऱ्यांनी शेतीचे नवे तंत्र अवलंबावे यासाठी इचलकरंजी शेतकरी संघाची स्थापना केली.बेंदराच्या निमित्ताने जनावरांच्या स्पर्धा,प्रदर्शने, शर्यती घोरपडे सरकारांनी भरविली.
इचलकरंजी मध्ये सहकार चळवळीची मुहूर्त मेढ देखील नारायणराव घोरपडेंनी रोवली होती.
फक्त इचलकरंजी नाही तर संस्थानातील छोट्या,मोठ्या खेड्यांत देखील त्यांनी पतपेढ्या उभारल्या.रयतेला बँकेत पैसे साठविण्याची सवय लावली.दक्षिण महाराष्ट्रातील संस्थानांचे प्रतिनिधी म्हणून त्यांची मुंबईच्या कायदेमंडळात नेमणूक झाली होती.तिथे अर्थसंकल्पावर त्यांनी केलेली अभ्यासपूर्ण भाषणे प्रचंड गाजली.
इचलकरंजीमध्ये वस्त्रोद्योग कसा सुरु झाला याची कथा देखील इंटरेस्टिंग आहे

इचलकरंजीमध्ये त्या काळी किरकोळ स्वरूपात हातमाग होते.त्यावर गालीच्याचे गुढार कापड विणले जात असे, पण या कापडाला फारशी मागणी नसल्यामुळे व्यवसाय नुकसानीचाच होत होता.हातमाग चालविणारे विणकर कर्जबाजारी झाले होते.जहागीरदारांनी त्यांना भांडवल देऊन सुत व रेशीम रंगविण्याचे काम सुरू केले.
१९०२ मध्ये मुंबईमध्ये भरलेल्या यंत्रसामुग्री प्रदर्शनास श्रीमंत नारायणराव घोरपडे यांनी भेट दिली.
तेव्हा इंग्लंडमधून आणलेला शेफिल्डचा यंत्रमाग त्यांनी पाहिला.इचलकरंजीच्याच विठ्ठलराव दातार या हुरहुन्नरी तरुणाला त्यांनी हे प्रदर्शन व तो यंत्रमाग पाहण्यासाठी पाठवून दिले. दातार मुंबईला गेले, त्यांनी तो यंत्रमाग खरेदी केला.आपला पुण्यातील कुलुपाचा बिझिनेस गुंडाळून यंत्रमागासह इचलकरंजीला आले.
१९०४ साली श्रीमंत घोरपडेंच्या कृपेने सुरु झालेल्या कारखान्यास त्यांनी आपल्या कुलदैवताचे नांव दिले.
व्यंकटेश रंग तंतू मिल.
पूढे मुंबईबाहेर विकेंद्रित झालेल्या कापड उद्योगाची ही सुरुवात होती.
दातार यांच्या कारखान्याचे यश बघून इचलकरंजीमधील इतरांनी यंत्रमाग कारखाने सुरू केले.बाबासाहेब घोरपडे यांनी १९०७ साली जिनींग कारखाना सुरु करण्यासाठी व्यापाऱ्यांना प्रोत्साहन दिले.नाममात्र भाड्याने जागा देऊन कारखानदारी वाढविली.
यंत्रमाग उद्योग इचलकरंजीमध्ये रुजावा म्हणून जहगीरदारांनी सढळ हाताने मदत केली.
बाहेर गांवचे कसबी कारागीर गांवात आणून वसवले.भांडवलाची सोय केली. बुगड,कांबळे,मराठे,सांगले या गावातील तरुणांनी देखील अपार मेहनत घेऊन व्यवसाय वाढवला.
कापसाचे एक बोंड देखील न पिकविणारी इचलकरंजी वस्त्रोद्योगाचे मँनेस्टरनगरी कशी बनली ? – पहा तर –
इचलकरंजी ही घोरपडे संस्थानची
जहागीर.मराठेशाहीच्या काळापासून हे गाव प्रसिद्ध
सुरवातीच्या काळात गावात धोतराचे कापड तयार होत होते.विसाव्या शतकाच्या सुरुवातीला जवळपास ३०० हातमाग असणाऱ्या गावात काहीच वर्षात १४०० यंत्रमाग धडधडत होते.
पहिल्या महायुद्धानंतर गावात रंगीत पातळे तयार होऊ लागली.तेव्हाच इचलकरंजीला मँचेस्टर ही ओळख मिळाली.
फक्त इचलकरंजीच नाही तर आसपासच्या छोट्या खेड्यातील शेतकरी देखील आपल्या गोठ्यात यंत्रमाग घालून कापडाचे उत्पादन घेऊ लागले.कोणतेही पारंपरिक कौशल्य नसताना,कापड उद्योगासाठी कच्चा माल उत्पादन होत नसताना इचलकरंजीच्या राजाच्या दूरदृष्टीच्या जोरावर हा व्यवसाय बहरला.
स्वातंत्र्यानंतर हे संस्थान विलिन झालं त्यानंतरही हा उद्योग वाढतच गेला.
दत्ताजीराव कदम,बाबासाहेब खंजीरे,रत्नाप्पान्ना कुंभार,बाळासाहेब माने,कल्लाप्पान्ना आवाडे यांच्यासारख्या नेत्यामुळे गावात सहकारी चळवळ रुजली. सहकारी सुतगिरण्या उभ्या राहिल्या.सायझिंग,प्रोसेसिंग कारखानेदेखील सहकारी तत्वावर उभे राहिले.याचा वस्त्रोद्योगोला प्रचंड फायदा झाला.
राजस्थान,गुजरात येथून आलेल्या व्यापाऱ्यांनीदेखील गावात बस्तान मांडलं.दूधात साखर विरघळावी तसे हे इचलकरंजीमध्ये विरघळून गेले.देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या उद्योगपतीमुळे गाव काँस्मोपाँलिटीन बनलं.
मजूरी करण्यासाठी आलेले गोरगरीब देखील आपल्या कष्टाने उद्योजक बनले.– कामगारांना न्याय देण्यासाठी पक्ष चळवळी उभ्या राहिल्या यामध्ये कॉम्रेड मलाबादे, पुंडलिक जाधव, असे अनेक इचलकरंजी शहरातील कामगार संघटनेचे नेते न्याय देण्यासाठी कामगारांच्या पाठीशी उभे राहिले
रात्रंदिवस धडधडणारे यंत्रमाग इचलकरंजीत अनेकासांठी रक्तवाहिनी बनले आहेत.सहकारी चळवळीपासून कामगार चळवळीपर्यत प्रत्येक चळवळ गावात रुजली व आजही जिवंत ठेवली.
जहागीरदारांच्या आलिशान राजवाड्यातच कल्लाप्पान्ना आवाडे या दूरदृष्टी असलेल्या नेत्याने स्व.वसंतरावदादा पाटील यांच्या मदतीने टेक्स्टाईल इंजिनिअरिंग काँलेज सुरू केले.
श्रीमंत नारायणराव बाबासाहेब घोरपडे यांनी पाहिलेले आधुनिकतेच स्वप्न आणखी पुढे गेले.इथे शिकुन बाहेर पडणाऱ्या इंजिनिअर्सनी गावात अँटोलूम, शटललेस लूम,एअरजेट लूम,गारमेंट, होजिअरी या सारखी हायटेक मशिनरी आणली.
गेली काही वर्षे मात्र सरकारची धोरणे व मंदीच्या कारणांनी गावातला वस्त्रोद्योग थंडावला आहे.
पंचगंगा नदीचा महापूर व कोरोना या लागोपाठच्या अस्मानी संकटांनी गावाचे कंबरडे मोडले आहे. मात्र इथले उद्योगपती,कारखानदार, कामगार,व्यापारी सहजासहजी हार मानणारे नाहीत.
वस्त्रोद्योगाच्या जागतिक नकाशावर तेजाने तळपणाऱ्या या नगरीच्या शतकोत्तर वाटचाल नव्या दमाने नव्या जोमाने पुन्हा उभारी घेईल यात शंका नाही.