दिवाळीत राजकीय वातावरण तापलं. – आमदार वैभव नाईकांचे निलेश राणेंना विधानसभा निवडणुकीत उभे राहण्याचे आव्हान.
( तर नारायण राणेंचा २०१४ ला पराभव केला होता. – आता निलेश राणेंनादेखील पराभूत करणारचं*
आमदार वैभव नाईक यांनी दिले राणेंना चॅलेंज. )
[भास्कर जाधव आणि मी चुकीचे वागलो असल्यास अटक करा.
आम्ही उद्धव ठाकरेंच्या सोबत कायम.- आमदार वैभव नाईक. ]
{ तर मी नारायण राणेंच्या दबावाला भीक घालत नाही. – आमदार वैभव नाईक झाले आक्रमक. }
सिंधुदुर्ग :- प्रतिनिधी.
सिंधुदुर्गात दिवाळीत राजकीय वातावरण तापू लागले आहे. वैभव नाईक विरुद्ध राणे यांच्यातील वाद वाढू लागला आहे.आता, वैभव नाईक यांनी निलेश राणेंनी लोकशाहीच्या मार्गाने निवडणुकीत उभं राहून दाखवावे असं खुलं आव्हान दिलं आहे.नारायण राणेंना २०१४ ला पराभव केला आता निलेश राणेंनादेखील पराभूत करू असेही नाईक यांनी म्हटले. आपण उद्धव ठाकरे यांची साथ सोडून जाणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
शिवसेना ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांच्याविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी चौकशी सुरू केली आहे. ही चौकशी आकसातून होत असल्याचा आरोप नाईक आणि ठाकरे गटाने केला आहे. शिवसेना ठाकरे गटाने याविरोधात कुडाळमध्ये मोर्चा काढला होता. यावेळी खासदार अरविंद सावंत, भास्कर जाधव यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावरही टीकास्त्र सोडले होते. या मोर्चाचा प्रत्युत्तर म्हणून भाजपने ‘संविधान समर्थन मोर्चा’ काढला होता. या मोर्चात भाजप नेते प्रसाद लाड, निलेश राणे यांनी वैभव नाईक यांच्यावर टीकास्त्र सोडले होते.
शिवसेना ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी म्हटले की, भाजपने संविधान समर्थन रॅली काढून संविधानाच्या विरोधात भूमिका घेतली. भाजप सोबत येत नाहीत त्याना जेलमध्ये टाकू असं भाषणात म्हणत होते. भाजपच्या संविधान समर्थन रॅलीत जे होते ते भाजपची सत्ता आल्यानंतर गेले होते. मला भाजपमध्ये येण्यासाठी दवाब तंत्र वापरत असलात तर मी त्याला भीक घालणार नाही. मी चौकशीला सामोरे जाईन. माझ्याकडे एक रुपया जरी बेहिशेबी आढळला तर मला फाशी द्या असं जाहीर आव्हान देतोय असे नाईक यांनी म्हटले. भास्कर जाधव आणि मी चुकीचे वागलो असल्यास अटक करा. आम्ही उद्धव ठाकरे यांच्या सोबत राहिलो म्हणून कारवाई करत असली तरी शिवसेनेसोबत राहणार असल्याचे नाईक यांनी म्हटले.
निलेश राणे आणि नारायण राणे यांनी दबावाखाली येऊन किती पक्ष बदलले.आम्ही मात्र कुणाचे मिंदे नसल्याने लोकांसमोर ठामपणे जात आहोत. कालच्या व्यासपीठावर असलेले लोक ही लोकांमधून निवडून आलेले नाहीत त्यामुळे त्यांच्याकडे लक्ष देण्याची गरज नाही असेही नाईक यांनी म्हटले.
निलेश राणेंनी निवडणुकीत उभे राहावे
निलेश राणेंनी लोकशाहीच्या मार्गाने निवडणुकीत उभं राहून दाखवावे, असे आव्हान नाईक यांनी दिले. नारायण राणेंचा 2014 च्या विधानसभा निवडणुकीत पराभव केला. आता विधानसभेच्या निवडणुकीत निलेश राणेनी उभं राहून दाखवावे त्यांना आस्मान दाखवणार असल्याचे नाईक यांनी सांगितले. निलेश राणे मात्र निवडणुकीत उभं राहण्याचं धाडसही करणार नाहीत आणि भाजपही त्यांना तिकिट देणार नाही असा टोलाही नाईक यांनी लगावला.
नारायण राणेंच्या दबावाला भीक घालत नाही.
वैभव नाईक यांनी राणे पिता-पुत्रांवर जोरदार टीका केली. देशात आणीबाणीची परिस्थिती आहे. वैभव नाईक यांना अटक करा अशी मागणी भाजप करत आहे. मला अटक करून भाजप दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहे. या सगळ्यामागे राणे आहेत हे आता जाहीर झालेलं आहे. या राणेंच्या दबावाला आधी भीक घातली नाही आणि यापुढेही भीक घालणार नसल्याचे नाईक यांनी सांगितले.