ऋतुजा लटके यांचा राजीनामा मंजूर करण्याचं काम सुरू. –
👉30 दिवस लागतील. – 👉इक्बाल सिंह चहल यांचं स्पष्टीकरण
मुंबई – प्रतिनिधी.
अंधेरी पोटनिवडणूक ही आता वेगळ्याच अर्थाने चर्चेत येण्याची जास्त शक्यता असून उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांचा राजीनामा अद्याप स्वीकारला नाही. ऋतुजा लटके यांचा राजीनामा मंजूर करण्याची प्रक्रिया सुरू असून येत्या 30 दिवसात ही प्रक्रिया करण्यात येणार असल्याचं स्पष्टीकरण मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी दिलं आहे. निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची मुदत केवळ दोन दिवस उरली असताना आता ऋतुजा लटके यांच्या उमेदवारीविषयी अजूनही संदिग्धता कायम आहे.
👉उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांनी आज महापालिका आयुक्तांची भेट घेतली. त्यावर प्रतिक्रिया देताना महापालिका आयुक्तांनी ही माहिती दिली आहे. ऋतुजा लटके यांच्या राजीनाम्यावर नेमका काय निर्णय घ्यायचा याची प्रक्रिया सुरू असून येत्या 30 दिवसांमध्ये या राजीनाम्यावर निर्णय होईल असं महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी सांगितलं.
👉ऋतुजा लटके या महापालिकेच्या सेवेत असून त्यांनी 3 ऑक्टोबर रोजी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. इक्बाल सिंह चहल यांनी दिलेल्या माहितीनुसार पुढचे 30 दिवस म्हणजे 3 नोव्हेंबरपर्यंत राजीनाम्याची प्रक्रिया सुरू असणार आहे. ऋतुजा लटके यांना राजीनामा दिल्याशिवाय ही निवडणूक लढवता येणार नाही. त्यामुळे ऋतुजा लटके यांच्या उमेदवारीचं काय होणार याची चर्चा सुरू आहे.
👉ऋतुजा लटके यांची न्यायालयात धाव.
दरम्यान, ऋतुजा लटके यांनी यावरुन न्यायालयात धाव घेतली असून त्यावर उद्या सकाळी 11 वाजता सुनावणी होणार आहे.
👉प्रशासन दबावाखाली
शिवसेनेचे नेते अनिल परब यावर प्रतिक्रिया देताना म्हणाले की, “ऋतुजा लटके यांचा राजीनामा अजूनही स्वीकारला जात नाही. त्यांच्या राजीनाम्याचा निर्णय वॉर्ड ऑफिसरपर्यंत सुटायला हवा होता. या विषयात महापालिका आयुक्तांचा तसा काही संबंध येत नाही. पण प्रशासनावर सत्ताधाऱ्यांचा दबाव असल्याचं दिसून येतंय. ऋतुजा लटके या जर शिंदे गटात असत्या तर याचं चित्र वेगळं असतं.”
👉आपल्यावर कोणताही राजकीय दबाव नसून आपण नियमाप्रमाणे काम करत असल्याचं महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी म्हटलं आहे.