सावधान..!
प्रिय ग्राहक…’असा मेसेज तुम्हालाही येईल अन् बँक अकाऊंट होईल रिकामं.
मुंबई. – प्रतिनिधी.
“प्रिय ग्राहक, आज रात्री तुमची वीज खंडित केली जाईल कारण तुमचे मागील महिन्याचे बिल भरलेले नाही. बिल भरण्यासाठी कृपया खालील लिंकवर क्लिक करा.” अशा टेक्स्ट किंवा व्हॉट्स ॲप मेसेजची लिंक तुमच्या स्मार्टफोमनवर देखील येऊ शकतो.
या लिंकवर क्लिक करताच, तुम्हाला टेलिकॉलर किंवा वेबसाइटकडे पाठवले जाईल आणि याठिकाणी थकित वीजबिल भरायला सांगितले जाईल. याची खात्री न करताच, बँक अकाऊंटचे तपशिल याला जोडल्यास यातून तुमचे पैसे थेट खात्यातून डेबिट केले जातील. त्यामुळे सावधान! कारण अशीच वीजबिल घोटाळा करणारी टोळी सध्या देशात कार्यरत असल्याची माहिती सायबर क्राईम विभागाकडून सांगण्यात आले आहे.
भारतात सायबर क्राईमच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोनुसार, भारतात ऑनलाईन बँकिंग-४०४७, एटीएम -२१६०, ११९४-क्रेडिट/डेबिट कार्ड आणि 1,093 OTP फसवणुकीची प्रकरणे नोंदवली गेली आहेत. यामध्ये आता आणखी एक फसवणूक प्रकरण पुढे आले आहे.
या नवीन वीजबिल घोटाळा प्रकरणात, स्कॅमरकडून लोकांना, ‘प्रिय ग्राहक, तुमचे वीज बिल भरलेले नाही’, असे सांगणारी लिंक असलेला एसएमएस पाठवला जातो. त्यांनी लिंकवर क्लिक करून बिल भरावे असेही यामध्ये सांगितले जाते. या लिंकमध्ये जाऊन तुमचे बँक अकाऊंट डिटेल्स देताच, काही तासात तुमचे अकाऊंट रिकामे होते. हे वीजबिल फसवणूकप्रकरण गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असून, यामुळे अनेक विज ग्राहकांची बँक खातीसुद्धा रिकामी झाली आहेत. त्यामुळे स्मार्टफोन वापरकर्त्यांनी अशा फसवणूकीच्या बाबतीत काळजी घ्यावी आणि सावध रहावे, असे सायबर क्राईम विभागाकडून सांगण्यात आले आहे.
घोटाळा करणारी टोळी झारखंडमधील
अलिकडील सायबर क्राईमच्या अहवालातून हे स्पष्ट करण्यात आले आहे की, सायबर क्राईम अधिकाऱ्यांनी झारखंडमधील एका जिल्ह्यातून फसवणूक करणाऱ्या टोळीला अटक केली आहे. त्यामुळे आता हे पुन्हा घडूच शकत नाही, असे काही सांगता येत नाही. त्यामुळे अशा प्रकारच्या टेक्स्ट किंवा व्हॉट्स ॲपवर आलेल्या लिंकवर कधीही क्लिक करू नका, असे सायबर क्राईमकडून सांगण्यात येत आहे.
दिल्ली पोलिसांच्या सायबर क्राईम युनिटने या वीज बिल घोटाळ्यात लोकांची फसवणूक करणाऱ्या ६५ जणांना अटक केली आहे. झारखंड, पश्चिम बंगाल, राजस्थान आणि मध्य प्रदेशमधील जामतारा येथून अशा प्रकारच्या घोटाळ्याच्या बहुतांश घटना घडल्याचे सांगण्यात येते. विशेष म्हणजे जामतारा येथील ही टोळी विविध माध्यमातून लोकांची फसवणूक करण्यासाठी प्रसिद्ध असल्याचे माहिती समोर आली आहे.