आमच्या स्वातंत्र्याचे काय? – स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षात कष्टकरी जनतेचा सवाल.- आजऱ्यात मिरवणूक काढून. रॅलीत कष्टकरी स्त्री-पुरुष मोठ्या संख्येने सहभागी.
आजरा – प्रतिनिधी.

सगळीकडे स्वातंत्र्याची ७५ वर्षे साजरी होत असताना आजरा तालुक्यातील कष्टकरी जनतेने श्रमिक मुक्ती दलाच्या नेतृत्वाखाली आमच्या स्वातंत्र्याचे काय? असा सवाल करून आज मिरवणूक काढली. रॅलीत कष्टकरी स्त्री-पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. एकीकडे देशभर स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव धुमधडाक्यात साजरा होत असताना तालुक्यातील कष्टकरी जनतेने आमच्या स्वातंत्र्याचे काय? असा सवाल विचारल्याने एक वेगळी चर्चा सुरू झाली. यावेळी बोलतांना श्रमुदचे कार्याध्यक्ष कॉ संपत देसाई म्हणाले या देशाला मिळालेले स्वातंत्र्य हे कष्टकरी जनतेच्या लढ्यातून मिळाले आहे. लढून मिळविलेल्या या स्वातंत्र्याचा सन्मान करणे आणि कष्टकऱ्यांच्या मुक्तीसाठी त्यांच्या नव्या स्वातंत्र्यासाठी संघर्ष उभा करणे हा या रॅलीचा मुख्य उद्देश आहे. स्वातंत्र्याचे ७५ वर्ष साजरे करतांना कष्टकऱ्यांच्या मुक्तीसाठीचा संघर्ष चालू ठेवणे हाच खरा तिरंग्याचा सन्मान आहे. तिरंग्याचा सन्मान होईल अशी धोरणे सरकारला घ्यायला लावण्याची शपथ आज आम्ही येथे घेत आहोत. यावेळी प्रा राजा शिरगुप्पे म्हणाले, स्वातंत्र्याच्या लढ्यात जे कुठेच नव्हते ते आज अमृतमहोत्सव साजरा करण्यात पुढे आहेत. आमच्या वाट्याला अजून खरे स्वातंत्र्य यायचे आहे. घटनेने दिलेल्या मूलभूत अधिकार मिळाले तरच खरे स्वातंत्र्य मिळाले असे म्हणावे लागेल. प्रा नवनाथ शिंदे यांनी बोलतांना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा संदर्भ आजचा काळ हा घटनाकाराना अपेक्षित असलेल्या समता स्वातंत्र्य या मूल्यांच्या अमलबाजवणी साठी कठीण आणि अवघड आहे. त्यामुळे आपणा सर्वांना ईथुनपुढच्या काळात या मूल्यांसाठी खरी लढाई करावी लागणार आहे. त्याचीच ही एक सुरवात आहे. सुरवातीला छ शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालून रॅलीची सुरवात झाली. स्वातंत्र्याची ७५ वर्षे- आमच्या स्वातंत्र्याचे काय? अशा घोषणा देत रॅली संभाजी चौकात आली. घोषणांनी चौक दणाणून सोडला. त्यानंतर तिथेच सभा झाली. सभेत संजय घाटगे, दशरथ घुरे, हरिबा कांबळे यांचीही भाषणे झाली. रॅलीचे नेतृत्व मुकुंद नार्वेकर, कृष्णा सावंत, प्रकाश मोरुस्कर, संतोष सुतार, निवृत्ती फगरे, नारायण भडांगे, नारायण राणे, काशीनाथ मोरे, शिवाजी भंगूत्रे, सुशीला होरंबळे, सोनाली रायकर इत्यादींनी केले. पांडुरंग गाडे यांनी आभार मानले.

