व्यवस्थेला प्रश्न विचारायची हिम्मत लेखक कवींनी ठेवावी.- प्रवीण बांदेकर
( आजऱ्यात प्रागतिक जनवादी साहित्य मंचचे उदघाटन
आजरा – प्रतिनिधी.
आपण का लिहतो आणि कोणासाठी लिहतो याचे नेमके भान लेखक कवीला असणे गरजेचे आहे. ज्यांना आवाज नाही अशा मूक माणसांचा आवाज बनणे, तो आपल्या साहित्यातून उमटवणे म्हणजेच लेखकाने भूमिका घेणे होय. आज काळ प्रचंड वेगाने भिरभिरत आपल्या अंगावर येऊन आदळत आहे अशा काळात लेखक कवींच्यावरील दाब वाढला आहे त्यामुळे लिहणे ही आता खूप कठीण आणि अवघड गोष्ट बनली आहे.
साठच्या दशकातील काळ आणि आजचा काळ यात खूप फरक आहे. त्यावेळच्या मूल्य संकल्पना वेगळ्या होत्या आज त्या वेगळ्या आहेत. मूल्यांची पडझड होणारा हा काळ आहे अशा वेळी लिहणे जबाबदारीने करावयाची कृती आहे याचे भान लेखक कवींना असणे गरजेचे आहे असेही ते म्हणाले. अशा कठीण आणि अवघड काळात प्रागतिक जनवादी साहित्य मंच सारख्या संस्था संघटनांची जास्त गरज आहे. लिहत्या हातांना योग्य वेळी नेमकी दिशा नाही मिळाली तर ते आपल्याच नादात आत्ममग्न होऊन जातात. त्यामुळे प्रागतिक जनवादी साहित्य मंचची स्थापना करून इथल्या चळवळीने योग्य पाऊले टाकली आहेत.असेही ते म्हणाले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थायावरून बोलतांना जेष्ठ साहित्यीक राजा शिरगुप्पे म्हणाले साहित्यिकांनी सामाजिक भान ठेवून आपले लिखाण केले पाहिजे केवळ रंजणवादी लिखाण करून भागणार नाही. हा मंच या परिसरातील नव्याने लिहणार्यांना निश्चित दिशा देईल. कार्यक्रमाला प्रा नवनाथ शिंदे, डॉ शिवशंकर उपसे, सुनील शिंत्रे, अशोक शिवने यांच्यासह मान्यवर उपास्थित होते. कॉम्रेड संपत देसाई यांनी प्रास्ताविक केले स्वागत सुभाष कोरे यांनी केले तर सूत्रसंचालन अनुष्का गोवेकर यांनी केले यावेळी झालेल्या कवी संमेलनात सुनीता खाडे, अनुष्का गोवेकर, अर्जुन मुतकेकर, वैष्णवी पाडले, कृष्णा सावंत, रणजीत कालेकर यांच्यासह आजरा चंदगड व गडहिंग्लज तालुक्यातील अनेक कवींनी आपल्या कविता सादर केल्या.
