सीएनजी महागला. –
भाडेवाढीसाठी रिक्षाचालकांचा 31 जुलैपासून संप.- लाखो रिक्षाचालकांचा सहभाग.
मुंबई. – प्रतिनिधी.
सीएनजीच्या दरात मागील वर्षभरात 28 रुपयांची वाढ झाली असतानाही रिक्षा भाडे वाढविण्यात आलं नाही.वारंवार मागणी करूनही कोणतीही दखल घेतली जात नसल्याने,कोकण विभागाच्या 5 जिल्ह्यांतील सुमारे 2 लाख 50 हजार रिक्षाचालक 31 जुलैच्या रात्रीपासून बेमुदत संपावर जाणार आहेत. अशी माहिती कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघ संघटनेचे अध्यक्ष प्रणव पेणकर यांनी दिली आहे.
रिक्षाचालकांनी बेमुदत संप पुकारल्यास प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता आहे. तसेच भाड्यातही वाढ होऊ शकते. गेल्या वर्षी प्रादेशिक परिवहन विभागाकडून रिक्षा चालकांना पहिल्या टप्प्यात 2 रुपयांची भाडे वाढ देण्यात आली होती. मात्र त्यांनतर वर्षभरात सीएनजीच्या दरात 28 रुपयांची दरवाढ झाली आहे. सीएनजीच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. मात्र दुसरीकडे रिक्षाचे भाडे वाढवण्यात येत नसल्याने त्याचा मोठा फटका हा रिक्षाचालकांना बसत आहे. त्यामुळे आता रिक्षाचालकांच्या वतीने संपावर जाण्याचा इशारा देण्यात आला आहे.
तीन महिन्यांपासून पत्र व्यवहार
एकीकडे सीएनजीचे दर तर वाढतच आहे. तर दुसरीकडे गाडीचे मेंटेनन्स, कागदपत्रे, जीएसटी यासाठी होणाऱ्या खर्चासह दैनंदिन खर्चाचा मेळ घालताना रिक्षा चालकांची आर्थिक ओढाताण होत असून, रीक्षा भाड्यात वाढ करण्यासाठी मागील 3 महिन्यापासून रिक्षा संघटनाकडून प्रशासनाकडे पत्रव्यवहार सुरू आहे. मात्र प्रशासन या पत्र व्यवहाराची दखल घेत नसल्याने 31 जुलैच्या रात्रीपासून प्रवासी भाडे न आकरता कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघ संघटनेकडून बंदचा इशारा देण्यात आला आहे . या संघटनेत ठाणे , पालघर , रायगड , सिंधुदुर्ग , रत्नागिरी अशा 5 जिल्ह्यातील सुमारे 2 लाख 50 हजार रिक्षाचालकांचा समावेश आहे.
31 जुलैपासून बेमुदत संप.
31 जुलैच्या रात्रीपासून सर्व रिक्षाचालक काम थांबवणार असून, संपादरम्यान आम्ही संबंधित कोणत्याही यंत्रणेला निवेदन देणार नसून जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत रिक्षा बंदच ठेवणार असल्याचा इशारा कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघ संघटनेचे अध्यक्ष प्रणव पेणकर व इतर पदाधिकाऱ्यांच्या वतीने देण्यात आला आहे. सीएनजीच्या दरात वाढ सुरूच आहे. याचा मोठा फटका हा प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांनासोबतच प्रवाशांना देखील बसत आहे. रिक्षा चालकांकडून भाड्यात वाढ करण्याची मागणी करण्यात येत आहे. तर दुसरीकडे ओला, उबेर सारख्या कंपन्यांनी आपल्या भाड्यात वाढ केली आहे.