ईडी म्हणते नवाब मलिक यांना रुग्णालयातून कारागृहात पाठवा. त्यांना वैद्यकीय उपचारांची आवश्यकता नाही.
आता वैद्यकीय उपचारांची आवश्यकता नसल्याने नवाब मलिक यांना कारागृहात पाठवा.- जामिनाच्या मागणीला विरोध करताना ईडीचा दावा
मुंबई :- प्रतिनिधी.
कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमच्या मुंबईतील मालमत्तांशी संबंधित आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी अटकेत असलेले राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांना आता वैद्यकीय उपचारांची गरज नाही. त्यामुळे त्यांना रुग्णालयातून पुन्हा तुरूंगात पाठवण्यात यावे, अशी मागणी करून अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मलिक यांच्या नियमित जामिनाच्या मागणीला विरोध केला आहे.
विशेष न्यायालयाने मे महिन्यात मलिक यांना खासगी रुग्णालयात सहा आठवड्यांच्या कालावधीसाठी उपचार घेण्याची परवानगी दिली होती. मात्र हा कालावधी संपुष्टात येऊन बरेच दिवस झाले आहेत. शिवाय मलिकांच्या सध्याच्या वैद्यकीय स्थितीबद्दल आपल्याकडे कोणतीही विश्वासार्ह माहिती उपलब्ध नाही. मलिक यांनीही त्यांच्या नियमित जामिनासाठीच्या अर्जात वैद्यकीय कारणांचा मुद्दा उपस्थित केलेला नाही. या सगळ्या पार्श्वभूमीवर मलिक यांना यापुढे वैद्यकीय उपचारांची आवश्यकता नाही आणि म्हणून पुढील तपासाच्या दृष्टीने त्यांना रुग्णालयातून पुन्हा कारागृहात पाठवण्यात यावे, अशी मागणी ईडीने केली आहे.