आयडी, पासवर्ड वापरून डिसले गुरुजींनीच काढला स्वतःचा पगार .- चौकशी समितीचा खळबळजनक अहवाल.
मुंबई. – प्रतिनिधी.
जागतिक पुरस्कार विजेते रणजितसिंह डिसले हे प्रतिनियुक्तीच्या कालावधीत तब्बल एक वर्ष 6 महिन्यांपेक्षा जास्त काळ गैरहजर होते. या कालावधीचा उपस्थिती अहवाल न देता त्यांनी परस्पर शालार्थ प्रणाली आयडी आणि पासवर्डचा वापर करून स्वतःचा पगार काढला, असा खळबळजनक अहवाल डिसले यांच्या चौकशीसाठी नेमलेल्या समितीने सादर केला आहे.
डिसले गुरुजी यांच्यावरील आरोपांची चौकशी करण्यासाठी उपशिक्षणाधिकारी संजय जावीर, शिक्षण विस्तार अधिकारी हरीश राऊत, गोदावरी राठोड, प्रभारी गटशिक्षणाधिकारी बंडू शिंदे, कनिष्ठ प्रशासन अधिकारी तजमुल्ल मुतवल्ली यांची समिती नेमण्यात आली होती. या चौकशी समितीने जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्था (डायट) यांच्याकडे चौकशी केली. डिसले 5 फेब्रुवारीला रुजू अहवालावर सही न करता निघून गेले तसेच 1 नोव्हेंबर 2018 ते 30 एप्रिल 2020 या दरम्यान प्रतिनियुक्तीला मुदतवाढ दिल्यानंतर एकदाही उपस्थित राहिले नाहीत, असे चौकशी समितीला माहिती देण्यात आली. दरम्यान, या संपूर्ण कालावधीत आपण सोलापूर विज्ञान केंद्र आणि सिंहगड इन्स्टिट्यूटमध्ये काम केल्याचा दावा डिसले यांनी केला. मात्र, त्याबाबत कोणताही लेखी पुरावा ते सादर करू शकले नाहीत.