जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांचे निधन. – ( नारा शहरात एका रॅलीत भाषण करताना गोळीबार झाला होता. )
नवी दिल्ली. – वृत्तसंस्था.
जपानचे माजी पंतप्रधान शिंदो आबे यांचे निधन झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. त्यांच्यावर नारा शहरात एका रॅलीत भाषण करताना गोळीबार झाला होता. गोळीबारानंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आले होते. मात्र प्रकृती गंभीर होती. शिंजो आबे यांच्या मानेजवळ गोळी लागली होती.
शिंजो आबे यांच्या हत्या प्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. तेत्सुया यामागामा असं त्याचं नाव आहे. नारा शहरात राहणाऱ्या तेत्सुया याच्यावर हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तेत्सुया याने शिंजो आबे यांच्यावर गोळीबार का केला हे मात्र समजू शकले नाही.
शिंजो आबे यांनी २०२० मध्ये जपानच्या पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला होता. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांनी पंतप्रधानपद सोडलं होतं. ते बऱ्याच काळापासून आजारी होते. गेल्या वर्षीच भारताने शिंजो आबे यांना पद्भ विभूषण देऊन गौरवलं आहे. लिबरल डेमोक्रेटिक पार्टीचे असलेले शिंजो आबे जपानमधील आक्रमक नेत्यांपैकी एक होते. आतड्याच्या आजाराने ते त्रस्त होते. यामुळेच त्यांनी पंतप्रधान पदावरून बाजूला होण्याचा निर्णय घेतला होता.
शिंजो आबे हे सलग २८०३ दिवस (७ वर्षे ६ महिने) पंतप्रधानपदी होते. याआधी हा विक्रम त्यांचे काका इसाकु सैतो यांच्या नावावर होता. शिंजो आबे यांना राजकारणाचे बाळकडूच घरात मिळाले होते. त्यांची आई ही माजी पंंतप्रधानांची मुलगी होती. तर त्यांचे काका, आजोबा हेसुद्धा पंतप्रधान होते. याशिवाय वडिलांनी परराष्ट्र मंत्री म्हणून काम केलं होतं.
