🟣शेताभोवतीच्या तारेच्या कुंपणाला विद्युत प्रवाह दिल्याने वृद्धाचा मृत्यू
( खानापूर येथील घटना. दोघांविरुद्ध गुन्हा दाखल.)
🟣ट्रॉलीचा हुक तुटून ट्रॉली अंगावर गेल्याने दोघांचा मृत्यू
( धामणे येथील अपघात )
🟣अज्ञात ट्रॅक्टर चालकाविरुद्ध गुन्हा.)
शक्तीपीठ बाधित शेतकऱ्यांचा सरकारला इशारा
🟣शेताभोवतीच्या तारेच्या कुंपणाला विद्युत प्रवाह दिल्याने वृद्धाचा मृत्यू
( खानापूर येथील घटना. दोघांविरुद्ध गुन्हा दाखल.)
आजरा – प्रतिनिधी.
खानापूर, ता. आजरा येथे शेताभोवतीच्या तारेच्या कुंपणाला विद्युत प्रवाह दिल्याने त्याचा स्पर्श होऊन एका वृद्धाचा मृत्यू झाला. ही घटना दि. २०/११/२०२६ रोजी सकाळी ०६.४५ वाजता आंबे शेत नावाच्या शेतात घडली. याबाबत दिगंबर भागोजी जाधव, वय ३१, रा. खानापूर यांनी आजरा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी व त्यांचे वडील तसेच इतर लोक फिर्यादी यांचा पळून गेलेल्या बैलाचा शोध घेत असताना आरोपी सुषमा सुभाष राणे व जितेंद्र सुभाष राणे, दोघे रा. खानापूर यांनी आपसात संगनमत करून त्यांचे शेताभोवती तारेचे कुंपण करून त्याला इलेक्ट्रिक सप्लाय दिला होता.

त्यास स्पर्श झाल्याने कोणीतरी मयत होऊ शकतो याची जाणीव असताना देखील बेजबाबदारपणे आपले शेताच्या घरातील इलेक्ट्रिक सप्लाय तारेच्या कुंपणास दिल्याने त्या तारेच्या कुंपणास फिर्यादी यांच्या वडिलांचा स्पर्श होऊन त्यांना इलेक्ट्रिक शॉक बसून ते मयत झाले.

या फिर्यादीवरून आजरा पोलीस ठाणे गु.र.नं. २६४/२०२६ भारतीय न्याय संहिता कलम १०५, ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. सदर गुन्ह्याचा तपास मा. वरिष्ठांचे आदेशाने मा. सपोनि सरवदे सो हे करीत आहेत.


🟡ट्रॉलीचा हुक तुटून ट्रॉली अंगावर गेल्याने दोघांचा मृत्यू
( धामणे येथील अपघात ; अज्ञात ट्रॅक्टर चालकाविरुद्ध गुन्हा.)
आजरा – प्रतिनिधी.
धामणे गावचे हद्दीवर बेलटीकी येथील डीपी समोर रस्त्यावर ट्रॅक्टरच्या ट्रॉलीचा हुक तुटून ट्रॉली पाठीमागे गेल्याने मोटारसायकलस्वारांच्या अंगावर ट्रॉली जाऊन झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला. ही घटना दि. १९/११/२०२६ रोजी रात्री १०.३० वाजता घडली.

याबाबत संदीप नारायण पोवार, वय ३८, व्यवसाय नोकरी, रा. धामणे, ता. आजरा यांनी फिर्याद दिली आहे. अज्ञात चालकाने त्याच्या ताब्यातील महिंद्रा अर्जुन कंपनीचा ट्रॅक्टर नंबर KA-23-TC-7048 हा ट्रॉली KA-23-TD-7194 मधून ऊस भरून घेऊन धामणे गावच्या दिशेने चालवित घेऊन जात असताना धामणे गावचे अलिकडे असलेले बेलटीकी येथील डीपी समोर त्याने त्याचे ताब्यातील ट्रॅक्टर हा रस्त्याचे परिस्थितीकडे दुर्लक्ष करून हयगयीने व बेदरकारपणे चालविल्याने ट्रॉलीचा हुक तुटून ट्रॉली वेगाने पाठीमागे जात असताना पाठीमागून येणारी मोटर सायकल एच एफ डिलक्स MH-09-CT-6053 वरील फिर्यादी यांचे दाजी महादेव दिनकर करवळ, वय ४९, रा. सोनारवाडी, ता. भुदरगड व पाठीमागे बसलेले त्यांचे मित्र बचाराम शिवाजी सुतार, वय ६५, रा. मिणचे खुर्द, ता. भुदरगड यांना ट्रॉली धडकून त्यांचे अंगावर ट्रॉली जाऊन अपघात झाल्याने ते गंभीर जखमी होऊन त्यांचे मृत्यूस कारणीभूत झाल्याने तसेच अपघाताची पोलीसांना माहिती न देता जखमींना कोणतीही वैद्यकीय मदत न करता पळून गेल्याने ट्रॅक्टर नंबर KA-23-TC-7048 वरील अज्ञात चालकाविरुद्ध फिर्याद दिली आहे.

आजरा पोलीस ठाणे गु.र.नं. २६३/२०२६ भारतीय न्याय संहिता कलम १०६(१), २८१, १२५(अ), १२५(ब) मो. व्हे. ॲक्ट कलम १३४(अ)(ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा तपास मा. सपोनि सरवदे सो हे करीत आहेत.
🟡कोणतीही पूर्वसूचना न देता मोजणी करण्याचा प्रयत्न झाल्यास गनिमी काव्याने उत्तर देऊ.
( शक्तीपीठ बाधित शेतकऱ्यांचा सरकारला इशारा.)
आजरा . प्रतिनिधी.
शेतकऱ्यांना कोणतीही पूर्वसूचना न देता मोजणी करण्याची प्रक्रिया राबवणाऱ्या महसूल यंत्रणेचा आम्ही जाहीर निषेध करीत आहोत. शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध असताना कोणतीही कल्पना न देता आज अचानक मोजणी पथक इसापूर येथे आले होते. शेतकऱ्यांना बेसावध ठेऊन अशी मोजणी करण्याचा शासनाचा हा प्रयन्त शेतकऱ्यांची फसवणूक करणारा आहे. आमचे महसूल विभागाला सांगणे आहे की त्यांनी सांगून मोजणीसाठी यावे आम्ही त्या पथकाला शेतकरी हिसका दाखवतील. पोलीस बळाचा वापर करून आजरा तालुक्यातही शक्तीपीठची मोजणी करण्याचे नियोजन सरकारी पातळीवर सुरू असल्याचे समजते. शेतकऱ्यांना बेसावध ठवून मोजणीचा प्रयत्न केल्यास आम्ही तो हाणून पाडू. कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी यापूर्वी अनेक मोर्चे आंदोलनातून आपला विरोध दाखवून दिला आहे.

त्यामुळे शेतकऱ्यांना बेसावध ठेवून पोलीस बळाचा वापर करायचा प्रयत्न झाल्यास आम्ही तो संघटितपणे शांतता मय मार्गाने हाणून पाडू असा इशारा शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या वतीने कॉ संपत देसाई, प्रा सुनील शिंत्रे, युवराज पोवार, तानाजी देसाई, प्रकाश मोरुस्कर यांनी पत्रकातून दिला आहे.
चौकट-
उद्या ज्या ठिकाणी इसापूर येथे शेतकऱ्यांना बेसावध ठेऊन मोजणी करण्याचा प्रयत्न झाला त्या ठिकाणी शक्तीपीठ विरोधी संघर्ष समितीच्या वतीने आम्ही कांही कार्यकर्ते भेट देणार आहोत. शेतकऱ्यांनी दबावाला अजिबात बळी पडू नये संघर्ष समिती आपल्यासोबत ठामपणे उभी राहील.

