राज्यात २४ तासांत ५१९ रुग्णांचा मृत्यू..
६२,०९७ नवे करोनाबाधित!
मुंबई प्रतिनिधी.
राज्यात एकीकडे पुन्हा कठोर लॉकडाउन लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला असताना दुसरीकडे कोरोना रुग्णांची आणि कोरोनामुळे होणाऱ्या मृतांची संख्या देखील दिवसेंदिवस वाढतच असल्याचं दिसून येत आहे. राज्यात गेल्या २४ तासांमध्ये तब्बल ५१९ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचं आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. त्यासोबतच, राज्यात दिवसभरात एकूण ६२ हजार ९७ नवे कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे आजपर्यंत राज्यात सापडलेल्या एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ३९ लाख ६० हजार ३५९ इतका झाला आहे. त्यासोबतच एकूण मृतांचा आकडा देखील ६१ हजार ३४३ इतका झाला आहे.
राज्यात आज दिवसभरात एकूण ५४ हजार २२४ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे रिकव्हरी रेट वाढणं अपेक्षित आहे. मात्र, दुसरीकडे नवे कोरोनाबाधित सातत्याने वाढत असल्यामुळे राज्याचा रिकव्हरी रेट सातत्याने खाली येऊ लागल्याचं गेल्या महिन्याभरात दिसून आलं आहे. सध्या राज्यात एकूण ६ लाख ८३ हजार ८५६ अॅक्टिव्ह कोरोना रुग्ण आहेत.
पुण्यात दिवसभरात ५५ रुग्णांचा मृत्यू
पुणे शहरात दिवसभरात ५ हजार १३८ कोरोना बाधित रुग्ण आढळले. तर आज अखेर ३ लाख ७६ हजार ९६२ इतकी संख्या झाली आहे. तर याच दरम्यान ५५ रुग्णांचा मृत्यू झाला असून मृतांची एकूण संख्या ६ हजार २१८ झाली. त्याच दरम्यान ६ हजार ८०२ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर आज अखेर ३ लाख १७ हजार ७६७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
