अग्निवीरांना आसाम रायफल्स भरतीमध्ये 10 टक्के आरक्षण.- गृह मंत्रालयाचा नवा निर्णय
मुंबई – प्रतिनिधी.
अग्निपथ योजनेवरुन देशातील विविध राज्यात तरुण रस्त्यावर उतरून आंदोलन करीत आहेत. एवढेच नाही तर सरकारी मालमत्तेचंही मोठं नुकसान झालं आहे. ही योजना मागे घ्यावी अशी मागणी विरोधी पक्षांसह विविध स्तरातून होत आहे. असे असताना केंद्र सरकार मात्र ही योजना कशी चांगली आहे हे पटवून देण्याचा प्रयत्न करीत आहेत. नुकतेच वायुसेना भरतीसाठी यावर्षी करिता वयोमर्यादा 21 वरून 23 वर्षे करण्यात आल्याचे सांगितले तर आता गृहमंत्रालयाकडून अग्निविरांकरिता 10 टक्के आरक्षण जाहीर करण्यात आले आहे.
काय आहे गृहमंत्रालयाचा निर्णय
केंद्रीय गृह मंत्रालयाने आज अग्निवीरांसाठी केंद्रीय सशस्त्र पोलीस दल CAPF आणि आसाम रायफल्समधील भरतीसाठी 10% रिक्त जागा राखून ठेवण्याचा निर्णय जाहीर केला आहे. हा निर्णय जाहीर करताना केंद्रीय गृह मंत्रालयाने केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आणि आसाम रायफल्समध्ये भरतीसाठी इच्छूक अग्निवीरांना उच्च वयोमर्यादेच्या पलीकडे अतिरिक्त तीन वर्षांची सूट देखील जाहीर केल्याचं ट्विटमध्ये म्हटलं आहे. त्यामध्ये अग्निवीरांना दोन्ही दलांमध्ये भरतीसाठी उच्च वयोमर्यादेतून 3 वर्षांची सूट देण्यात आली आहे असं म्हटलं आहे. अग्निवीरच्या पहिल्या बॅचसाठी वयाची अट उच्च वयोमर्यादेपासून 5 वर्षे असेल. सध्याच्या नियमांनुसार, केंद्रीय सशस्त्र पोलीस दलामध्ये माजी सैनिकांसाठी 10 टक्के कोटा आहे.