वटपौर्णिमेचा फणस बाजारात. – कापा फणसाची होणार जोरदार विक्री.
घाटकोपर (शांताराम गुडेकर )

आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये अनेक सण उत्साहाने, आनंदाने साजरे केले जातात, त्याच पैकी एक म्हणजे वट पौर्णिमा. ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा ही वट पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. या व्रत दरम्यान विवाहित स्त्रिया आपल्या पतीला उत्तम आरोग्य लाभावे, दिर्घआयुष्य प्राप्त व्हावे यासाठी प्रार्थना करतात आणि मनोभावे वडाच्या झाडाची पूजा करतात. वडाच्या वृक्षाचे आयुष्य जास्त असते तसेच त्याच्या पारंब्यांचा विस्तारही खूप मोठा होतो. त्याचप्रमाणे नैसर्गिकतःच दीर्घायुष्य लाभलेल्या वडाच्या वृक्षाप्रमाणे आपल्या पतीला आणि कुटुंबियांना आरोग्यसंपन्न दीर्घायुष्य लाभावे हा त्यामागचा हेतू आहे. वटपौर्णिमेच्या दिवशी सुवासिनी महिला मराठी पेहराव करतात; नववारी साडी, दागिने यांनी स्वतःला सजवून घेतात. त्यादिवशी सर्व सुवासिनी पारंपरिक वेशभूषा करून पूजेचे ताट हातात घेऊन एकत्र वटवृक्षाची पूजा करण्यासाठी जातात. प्रत्येक गावामध्ये सहसा एक ठरलेले वडाचे झाड असते जिथे ही पूजा होते, शक्यतो गावी मंदिराच्या आवारात किंवा जवळच्या परिसरात वडाचे झाड नक्कीच असते. सौभाग्यच प्रतीक मानले जाणारे हळद-कुंकू आणि काळी पोत, हिरव्या बांगड्या हे सौभाग्य अलंकार तेथे अर्पण करतात. फळांचा राजा आंबा हा तेथे वटवृक्षाची पूजा करताना ठेवतात.सोबत ५ फळांचे ५ वाटे बनवतात. ते सुपामध्ये सजवतात आणि सुंदर रुमालाने तो झाकून घेतात. ते वाटे खाण्यासाठी लहान मुले पूजेच्या ठिकाणी आवर्जून गर्दी करतात. तसेच दूध साखरेचा नैवेद्यही दाखवतात. त्यानंतर वडाच्या झाडाला सफेद दोरा गुंडाळून पाच प्रदक्षिणा घालतात, आणि शेवटी त्या धाग्याची वडाच्या खोडाला गाठ मारतात.वटपौर्णिमेच्या वानात आंबासह फणसाच्या गराला महत्त्व आहे.त्यामुळे दरवर्षी वटपौर्णिमेच्या काही दिवस आधीच घाटकोपर, विक्रोळी. भांडुप, मुलुंड, चेंबूर, विलेपार्ले, अंधेरी, खार,बोरिवली, कांदिवली, दादर आदी भागात फणस बाजारात मोठ्या प्रमाणात दखल होतात.६० रुपया पासून १०० रुपया पर्यंत या फणसाची किंमत आहे.मंगळवारी (दि.१४ जून )वटपौर्णिमा असून फणसाची विक्री होत आहे असे घाटकोपर परिसरातील विक्रेते नामदेव पार्टे यांनी बोलताना सांगितले.