कोरोना संसर्ग.
ICSE बोर्डाकडूनही दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय
नवी दिल्ली. वृतसंस्था. २०.
देशातील वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर काउंसिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन्स (ICSE board) बोर्डाने अखेर दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. तर बारावीची परीक्षा ही ऑफलाईन पद्धतीनेच होईल. या परीक्षेची नवी तारीख आणि वेळापत्रक आणखी काही दिवसांनी जाहीर करण्यात येईल, असे ICSE बोर्डाकडून सांगण्यात आले.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्टीकरण बोर्डाकडून देण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वीच सीबीएसई बोर्डाचीही दहावीची परीक्षा रद्ध झाली होती. त्यामुळे आता महाराष्ट्र सरकार या दोन्ही बोर्डांच्या पावलावर पाऊल ठेवणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
तत्पूर्वी, राज्य मंडळाच्या परीक्षा पुढे ढकलून त्या मे-जूनमध्ये घेणार असल्याचे शिक्षण विभागाने नुकतेच जाहीर केले. आता ‘सीबीएसई’प्रमाणेच राज्यानेही दहावीच्या परीक्षा रद्द करण्याची मागणी पुढे आली आहे. मात्र राज्यातील परीक्षा होणार असल्याचे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केले.