सोमवार ऐवजी शनिवार रोजी वीज पुरवठा खंडित करा. – महावितरणला आजरा मनसेचे निवेदन.

शासन दरबारी सरकारी कामकाजाचा आता पाच दिवसांचा आठवडा करण्यात आलेला असल्यामुळे सरकारी कामासाठी आजरा तालुक्यातील नागरिकांना आठवड्यातून पाच दिवस मिळतात यामध्ये आपल्या कार्यालयाकडून प्रत्येक सोमवारी सकाळी दहा ते सायंकाळी सहा पर्यंत वीज पुरवठा खंडित करून वीज वितरणची कामे केली जातात. तर ग्रामीण भागात सोमवार रोजी शेतावरची कामे ( पाळकामुळे ) विश्रांतीचा दिवस असल्याने तालुक्यातील नागरिक सरकारी कामानिमित्य तालुक्याला येतात परंतु विद्युत प्रवाह खंडित झाल्यामुळे शासकीय कामकाज ठप्प असते. आपले कार्यालयाकडून सोमवार रोजी वीज कपात केल्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. त्यात सोमवार हा आठवड्याचा पहिला दिवस असूनही नागरिकांची कोणतीही कामे होत नाहीत त्यामुळे वीज कपातीचा दिवस बदलून सोमवार ऐवजी शनिवारी करण्यात यावा त्याचप्रमाणे सध्या पावसाला सुरुवात होत असून अजून बऱ्याच ठिकाणी झाडांच्या फांद्या विचारांना लागून तारा तुटण्याचा धोका आहे. यामुळे बऱ्याच वेळा वीज पुरवठा खंडित होत राहतो काही दिवसापूर्वी झाडाची फांदी तोडत असताना धनगरमोळा येथील शेतकऱ्यांचा विजेचा तारेला स्पर्श होऊन दुर्दैवी मृत्यू झाला आहे. असे अपघात रोखण्यासाठी वरील धोका लक्षात घेऊन सर्व लाईन वरील झाडांच्या फांद्या, मेसकाठी तोडण्यात यावी. या वरील विषयासंदर्भात आपल्या वरिष्ठ कार्यालयाकडून अधिकाऱ्यांसमवेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकारी यांची बैठक लवकरात लवकर घेण्यात यावी वरील विषयावर गांभीर्यपूर्वक लक्ष देऊन लवकरात लवकर योग्य ती कारवाई करण्यात यावी अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आपले कार्यालयासमोर निदर्शने करण्यात येतील याची नोंद घ्यावी. अशा अशयाचे निवेदन आजरा महावितरणचे उपअभियंता श्री कमतगी यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेना आजरा तालुका यांच्या वतीने देण्यात आलेले आहे. या निवेदनावर जिल्हाउपाध्यक्ष सुधीर सुपल, तालुकाध्यक्ष अनिल निऊगरे, उपाध्यक्ष आनंदा घंटे, सचिव चंद्रकांत सांबरेकर, विद्यार्थी सेना अध्यक्ष अश्विन राणे, सह पदाधिकारी यांच्या सह्या आहेत.