दिव्यांगांसाठी ग्रामपंचायतींसह पंचायत समित्याही ५ टक्के निधी खर्च करणार उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत
रत्नागिरी :- प्रतिनिधी.
दिव्यांगांचे प्रश्न दुर्लक्षित होता कामा नये. ग्रामपंचायत तसेच पंचायत समिती स्तरावर ५ टक्के निधी या समाजघटकासाठी खर्च करुन रत्नागिरी जिल्हा राज्यापुढे आदर्श निर्माण करेल असा संकल्प करुन या. यासाठी सर्वांनी कामाला लागावे असे आवाहन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज केले.
येथील कुवारबाव परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनात वयोश्री योजना आणि दिव्यांग व्यक्ती यांच्यासाठी एडीपी योजनेतून कृत्रिम अवयव आणि इतर मदतीची साधने व यंत्रे यांच्या वाटपाचा कार्यक्रम आज झाला. या कार्यक्रमात ते बोलत होते.
खासदार विनायक राऊत यांच्या प्रयत्नामधून जिल्हयात या योजनोसाठी शिबीरांचे आयोजन करुन तपासणी करण्यात आली त्यातील पात्र लाभार्थी व्यक्तींना हे वाटप करण्यात आले. जिल्हयात खासदार राऊत यांच्या पुढाकाराने ६ कोटी रुपये रकमेची ही साधन वाटप करण्यात येत आहेत त्याबद्दल मी खासदार विनायक राऊत यांच्या सामाजिक पुढाकाराबद्दल त्यांचे अभिनंदन करतो असे सामंत यावेळी म्हणाले.
यासोबतच वयाने ज्येष्ठ असणाऱ्या प्रत्येक व्यक्तला आपण आपल्या आईवडीलांप्रमाणे वागवले पाहिजे. त्यांचेही आशिर्वाद आपणास मिळतील असे सांगून उदय सामंत म्हणाले की समाजातील या घटकांसाठी आपण काम केले तरच ज्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाने आपण देश चालवतो त्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न साकार होवू शकेल.
पूर्णाकृती पुतळा
रत्नागिरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन हे राज्यातील सर्वप्रथम झालेले सुसज्य असे भवन आहे. या परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा असावा अशी मागणी आहे. नागरिक तसेच आंबेडकरी चळवळीतील सर्वांची मागणी मान्य करत या ठिकाणी डॉ.आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात येईल अशी घोषणा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी या कार्यक्रमात केली.
केंद्र शासन आणि राज्य शासन स्तरावर या दिव्यांगांसाठी विविध योजना आहेत. त्यासाठी ग्रामपंचायती आणि पंचायत समिती यांनी सर्वप्रथम जिल्हयातील एकूण दिव्यांगांची नोंदणी पूर्ण करण्यासाठी मोहिम हाती घ्यावी अशाही सूचना त्यांना जिल्हा परिषद अधिकाऱ्यांना दिल्या.
जिल्हयात या अवयव व इतर साहित्य वाटपात कृत्रिम पाय, चालण्यासाठी काठी, गरजेनुसार व्हील चेअर, चेअर सायकल, अत्यल्प दृष्टी असणाऱ्यांसाठी विशेष मोबाईल यासह इतर साहित्याचाही समावेश आहे.
या कार्यक्रमास अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पी.डी.यादव, माजी जिल्हा परिषद सदस्य बाबू म्हाप, माजी नगराध्यक्ष बंडया साळवी, विलास चालके, गटविकास अधिकारी जे.पी. जाधव, आस्था सोशल फाऊंडेशनच्या सुरेशा पाथरे आदि मान्यंवर उपस्थित होते.
