मंत्र्याची गाडी वाहतूककोंडीत अडकली अन् वाहतूक पोलिसांनं वाहनचालकाच्या कानशिलात लगावली. कोल्हापुरात घडला प्रकार
( वाहनचालकाला मारहाण करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याविरोधात आता संताप व्यक्त केला जात असून कारवाईची मागणी करण्यात येत आहे.)
कोल्हापूर :- प्रतिनिधी.
कोल्हापूरमध्ये एक विचित्र घटना घडली आहे. यामध्ये मंत्र्याची गाडी वाहतूककोंडीत अडकल्याने एका पोलिसाने चक्क वाहनचालकाच्या कानशिलात लगावली आहे.राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड कोल्हापूरच्या दौऱ्यावर असताना हा प्रकार घडला आहे. अचानक आव्हाड यांचा ताफा आल्यामुळे वाहतूक कोंडीतून वाट करून देताना पोलिसांची चांगलीच दमछाक झाली होती. यावेळी एका पोलीस हवालदाराने एका वाहनधारकाच्या चक्क कानशिलात लगावली. या प्रकरणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड काल कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. कोल्हापूरच्या भाऊंसिंगजी रोडवर जितेंद्र आव्हाड यांचा ताफ पोहोचला त्यावेळी ही घटना घडली. आव्हाडांचा ताफा जात असताना अचानक एका चौकात वाहतूक कोंडी झाली होती. मंत्री जितेंद्र आव्हाड यांचा ताफा थांबल्यामुळे पोलिसांची अडकलेल्या गाड्यांना बाजूला हटवण्यासाठी एकच धावपळ उडाली. आव्हाड यांच्या ताफ्याला रस्ता मोकळा करून देताना एका पोलिसाने वाहनधरकावरच आपला राग काढला. जितेंद्र आव्हाड हे अंबाबाईच्या दर्शनासाठी आले होते.
यावेळी संतप्त झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याने थेट एका जीप चालकाच्या कानशिलात मारली. हा सगळा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. जितेंद्र आव्हाड यांच्यासह शिवसेनेचे नेते संजय राऊत हेदेखील काल कोल्हापुरात होते. या दोन्ही नेत्यांची भेटही काल झाली. आमचे ठरले आहे, असे हातात हात देत संदेशही त्यांनी दिला होता. संजय राऊत आणि जितेंद्र आव्हाड यांची कोल्हापूर शासकीय विश्रामगृहाच्या आवारात ही भेट झाली होती. या भेटीवेळी दोघांनी एकमेकांना हस्तांदोलनसुद्धा केले.