गोव्यात आमिषे दाखवून बळजबरीने धर्मांतरण.- फाईव्ह पिलर’ चर्चचा धर्मगुरू डिसोझाला अटक.
म्हापसा. प्रतिनिधी.
आमिषे दाखवून बळजबरीने धर्मांतरण केल्याच्या तक्रारींची दखल घेत सड्ये-शिवोली येथील फाईव्ह पिलर चर्चचा धर्मगुरू तथा स्वयंघोषित गॉड मॅन डॉम्निक डिसोझा याला म्हापसा पोलिसांनी गुरुवारी रात्री अटक केली.अटकेनंतर तब्येत बिघडल्याने त्याला येथील म्हापसा येथील जिल्हा इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्याविरुद्ध पोलिसांनी वेगवेगळ्या प्रकरणात दोन गुन्हे नोंदविले आहेत.
प्रकाश कृष्णा खोब्रेकर (कुचेली-म्हापसा) आणि निखिल शेट्ये (खोर्ली-म्हापसा) यांनी बुधवारी म्हापसा पोलिसांत लेखी तक्रार दाखल केली होती. त्या तक्रारीत डॉम्निक डिसोझा, त्यांची पत्नी जुआन मास्कारेन्स आणि त्यांच्या इतर सहकर्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. तक्रारीला अनुसरून गुरुवारी डॉम्निक याला अटक करण्यात आली.
डॉम्निक याने आपल्याला आजारपणातून बरे करण्याचे आमिष दाखविले. त्या बदलात बळजबरीने धर्मांतर करण्यासाठी त्याने दबाव आणला. धर्मांतराला विरोध केल्यानंतर आपल्याला धमकी दिली आणि आपल्या धार्मिक भावना दुखावल्या, असे फिर्यादींनी तक्रारीत नमूद केले आहे. या तक्रारीच्या आधारे म्हापसा पोलिसांनी आरोपींविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 153 अ, 295 अ, 506 (2) तसेच जादूटोणा प्रतिबंधकच्या कलम 3 व 4 नुसार गुन्हा नोंदविला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक परेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक गौरव नाईक करीत आहेत.
काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी धर्मांतराविरोधात इशारा दिला होता. राज्यात धर्मांतराचे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत, असे त्यांनी जाहीरपणे स्पष्ट केले होते. त्यानुसार धर्मांतराविरोधात तक्रार दाखल होताच डॉम्निकला अटक करण्यात आली आहे
