मुंब्र्यातील 6 कोटींच्या घबाड प्रकरणी तीन अधिकाऱ्यांसह सात पोलीस निलंबित
ठाणे – प्रतिनिधी.
काही दिवसांपूर्वी मुंब्रा पोलिसांनी मुंब्रा बॉम्बे कॉलनी येथील फैजल मेमन या व्यापाऱ्याच्या घरावर मध्यरात्री टाकलेल्या धाडीत 30 कोटी रुपयांची रोकड आढळून आली होती. या रकमेपैकी ६ कोटी रुपये उपस्थित पोलीस अधिकाऱ्यांनी परस्पर काढून घेत संबंधित व्यापाऱ्याला क्लीनचिट दिली होती. याबाबत काही दिवसांनी एक पत्र व्हायरल झाल्यानंतर प्रसारमाध्यमांमध्ये मुंब्रा पोलिसांच्या कामगिरीवर मोठ्या प्रमाणावर टीका होत होती. आपलं महानगरने पोलिसांच्या या धाडीचा पर्दाफाश केला होता.
अखेरीस याबाबत बुधवारी ठाणे पोलीस आयुक्त जय अजित सिंग यांनी एक पोलीस निरीक्षक दोन पोलीस उपनिरीक्षक सात पोलीस कर्मचारी यांना तत्काळ निलंबित करण्याची कारवाई केली. तसेच मुंब्रा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि सहाय्यक पोलीस आयुक्त यांचीही चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे ठाणे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
काय होते नक्की प्रकरण?
मुंब्रा पोलीस स्टेशनमध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या दालनामध्ये 30 कोटींचे हे 30 बॉक्स ठेवण्यात आले होते. तिथे मेमन यांना घेऊन गेल्यानंतर मात्र पोलीस अधिकार्यांनी त्यांना धमकावून प्रकरण दाबण्यासाठी पैसे मागण्यास सुरुवात केली. अखेरीस पोलिसांच्या दबावाला घाबरल्याने मेमन २ कोटी रुपये देण्यास तयार झाले. यावेळी पोलिस अधिकार्यांनी आम्ही २ कोटी यातून काढून घेतो आणि उरलेले तुला परत करतो, असे सांगितले, मात्र प्रत्यक्षात ३० कोटींमधून २ कोटींऐवजी त्यामधून ६कोटी रुपये काढून घेतले आणि उरलेले 24 कोटी रुपये मेमन यांना परत केले. एवढे पैसे का घेतले, असे मेमन यांनी विचारण्याचा प्रयत्न केला असता पोलीस अधिकार्यांनी लाथा मारून त्यांना बाहेर काढले, असे देखील या व्हायरल पत्रात म्हटले होते.
कोण आहे फैजल मेमन?.
मुंब्रा बॉम्बे कॉलनी येथील घरावर धाड टाकण्यात आलेले फैजल मेमन हे मुंबईसह ठाणे, भिवंडीमध्ये लहान मुलांच्या खेळण्यांचे व्यापारी आहेत. तसेच ते भागीदारीमध्ये बांधकाम व्यावसायिकही आहेत, असे सांगण्यात आले. धाडीत त्यांच्या घरी पोलिसांना आढळलेल्या 30 कोटींपैकी 20 कोटी रुपये त्यांना चेकने आले होते. उर्वरित 10 कोटी अन्य मार्गाने आले होते, असेही सांगण्यात येते.
