कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीत राजकीय नेत्यांनी भरविला ‘बोरीचा बार’.- व्यक्तिगत राजकारण थांबवा आणि कोल्हापूरच्या विकासावर बोला… नागरिकांचे मत.
कोल्हापूर. – प्रतिनिधी. ०६
कोल्हापुरातील गेल्या तीन दशकांतील निवडणुकीचा काळ आठवा! प्रथम मंडलिक-घाटगे आणि नंतर मंडलिक-मुश्रीफ, आवाडे-माने, आवळे-आवाडे, कोरे-पाटील, गायकवाड-सरूडकर, खानविलकर-महाडिक, शिंदे-कुपेकर आणि गेली काही वर्षे मुन्ना-बंटी. या राजकाhरणात या जोड्या प्रसिद्ध झाल्या आणि त्यांच्याच भोवती कोल्हापूरचे राजकारण फिरत राहिले. निवडणुका आल्या की, दोन्ही प्रतिस्पर्धी एकमेकांविरुद्ध चिखलफेक करण्यासाठी बार भरून तयार. यातून बार उडाले, राजकीय वस्त्रहरण झाले; पण कोल्हापूर विकासाच्या क्षितिजावर मात्र शून्याभोवतीच फिरत राहिले. त्यातल्या त्यात पहिल्या दोन दशकांत काळम्मावाडीचे पाणी शिवारात फिरू लागले. रेल्वेस्थानकाचे थोडे रुपडे बदलले. उजळाईवाडीला विमान उतरले. तीन औद्योगिक वसाहती, डझनभर साखर कारखाने उभारले, हे वास्तव नाकारता येत नाही; पण डझनभर सूतगिरण्या चात्या फिरण्याअगोदरच बंद पडल्या. राजर्षींनी मोठ्या दूरदृष्टीने उभारलेल्या शाहू मिhलचे धुराडे बंद झाले. सरकारी शाळा बंद पडू लागल्या. त्याचबरोबर कोल्हापूरवर प्रदूषणाचा मोठा शिक्काही बसला. या सर्वांमध्ये कोल्हापूर विकासाच्या महामार्गावर कोठे आहे, असा प्रश्न विचारण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळेच तुमचे व्यक्तिगत राजकारण थांबवा आणि कोल्हापूरच्या विकासावर बोला, असे म्हणण्याची वेळ सर्वसामान्य मतदारांवर येऊन ठेपली आहे.