खेडगे गावला स्वतंत्र महसूल गाव म्हणून दर्जा देण्याचे जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांचे निर्देश.
आजरा. प्रतिनिधी. ०४
श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ भारत पाटणकर आणि कार्याध्यक्ष कॉ संपत देसाई यांच्या उपस्थितीत दि. ३ रोजी कोल्हापूर येथे सर्फनाला प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाबाबत बैठक झाली. या बैठकीला अप्पर जिल्हाधिकारी किशोर पवार, प्रांताधिकारी वसुंधरा बारवे, कार्यकारी अभियंता एस. आर. पाटील, तहसीलदार विकास अहिर यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. यावेळी सर्फनाला प्रकल्पामुळे पारपोली, गावठाण ही गावे विस्थापित होत असून पारपोली पैकी खेडगे हे गाव आहे तिथेच राहत असल्याने खेडगे या गावाला स्वतंत्र महसूल गावं म्हणून घोषित करण्यात येईल. तसा प्रस्ताव तातडीने करावा असे निर्देश झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी यांनी महसूल यंत्रणेला दिले.
लाभक्षेत्रात ज्या जमिनी वाटप केल्या आहेत त्यांचे नकाशे घेऊन शेतकऱ्यांना त्याचे फाळणी नकाशे बनवून मोजणी करून देण्याचाही सूचना यावेळी देण्यात आल्या. ज्या जमिनी खडकाळ किंवा नापीक असतील त्यांचे सपाटीकरण व माती टाकून देण्याची प्रक्रिया एप्रिलमध्ये करण्यात याव्यात अशा सूचना देऊन प्रकल्पग्रस्तना जमीन ही कसण्यालायकचं दिली जाईल यासाठी पाटबंधारे खात्याने सर्व ती जबाबदारी उचलावी असेही त्यांनी सांगितले. जमीन कमी पडत असल्यास देवर्डे येथील संपादन प्रक्रिया राबविण्याच्या सूचनाही दिल्या. ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी संपादन न करता वापरल्या गेल्या त्यांना भूभाडे देण्याचे निर्देश दिले गेले. धरणासाठी घातलेल्या सुरुंगामुळे खेडगे येथील कांही घरांना तडे जात असल्याने सुरुंगाची क्षमता कमी करावी आणि ज्या घरांना तडे गेले आहेत किंवा भिंत खचली आहे त्यांना नुकसान भरपाई देण्याची सूचना त्यांनी दिली. यावेळी गंगाराम ढोकरे, हरी सावंत, गोविंद पाटील, धोंडिबा सावंत, अनिल अमूनेकर, एकनाथ गुंजाळ, राजाराम अमूनेकर, लक्ष्मण शेटगे नवनाथ अमूनेकर यांच्यासह प्रकल्पग्रस्त उपस्थित होते.