Homeकोंकण - ठाणेक्रांतिकारक आणि समाजसुधारकांनी पावन केलेल्या कामाठीपुर्‍याला बदनाम का करता? स्वराज्य भूमि चळवळीचे...

क्रांतिकारक आणि समाजसुधारकांनी पावन केलेल्या कामाठीपुर्‍याला बदनाम का करता? स्वराज्य भूमि चळवळीचे अध्वर्यू प्रकाश सिलम यांनी ठणकावले.

क्रांतिकारक आणि समाजसुधारकांनी पावन केलेल्या कामाठीपुर्‍याला बदनाम का करता? स्वराज्य भूमि चळवळीचे अध्वर्यू प्रकाश सिलम यांनी ठणकावले.

मुंबई, दि. ४ (प्रतिनिधी)

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पासून, महात्मा जोतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पर्यंत अनेक क्रांतीकारक, समाजसुधारकांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या कामाठीपुऱ्याला बदनाम का करता ? असा संतप्त सवाल महाराष्ट्र विधानसभेचे पहिले अध्यक्ष सयाजीराव सिलम यांचे नातू आणि स्वराज्य भूमी चळवळीचे अध्वर्यू प्रकाश सिलम यांनी केला आहे. एका वादग्रस्त चित्रपटाच्या प्रदर्शनावरुन सध्या जोरदार संघर्ष उद्भवला असल्याचे दिसून येते. या पार्श्वभूमीवर प्रकाश सिलम यांनी आपली भूमिका स्पष्ट करतांना कामाठीपुऱ्याला बदनाम करु नका, अशी कळकळीची विनंती केली आहे. प्रकाश सिलम म्हणतात, “कामाठीपुरा हा कष्टाळु आणि लढवय्या लोकांचा भाग आहे. इथला इतिहास जाणून घेतल्याशिवाय या भागाचं महत्व समजणार नाही. ब्रिटिश काळात चौदावी आणि पंधरावी गल्ली ही वेश्यांसाठी राखून ठेवण्यात आली होती. बाकीच्या गल्ल्यांमध्ये तेलुगु लोकांसहीत कोकणी, भंडारी, घाटावरची कुटुंबेही इथे संघटिततेने रहात होती. या वस्तीत मुंबईला अभिमान वाटावा अशी कर्तबगार व्यक्तीमत्वे रहात होती.  सुरुवात करायची तर भारतीय स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतलेले अनेक क्रांतीकारक, संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात भाग घेतलेली अनेक कुटुंबे इथे रहात होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे लिखाण इथल्या छापखान्यात छापले जात होते. याच कामाठीपुर्‍यातल्या तेलुगु लोकांनी ज्योतिबा फुले यांना जाहिरपणे महात्मा ही पदवी दिली होती. सुरुवातीच्या काळात प्रबोधनकार ठाकरेही इथे रहात होते. अलिकडचे लढाऊ नेते आणि साहित्यिक नामदेव ढसाळही इथलेच ! पुण्यात लोकमान्य टिळकांनी अस्पृश्यांना मंदिरे उघडून द्या असे आवाहन केल्यावर सयाजी लक्ष्मण सिलम यांच्या नेतृत्वाखाली तेलुगु मित्र मंडळाने कामाठीपुर्‍यातील आठ मंदिरे अस्पृश्यांना उघडून दिली. मुंबईतले हे पहिले क्रांतीकारक पाऊल होते. त्यानंतर मुंबईतली अनेक मंदिरे अस्पृश्यांसाठी खुली झाली. व्ही टी स्टेशन, जुने सचिवालय,  बॅलार्ड इस्टेट, बृहन्मुंबई महानगरपालिका अशा असंख्य इमारती स्थानिक तेलुगु लोकांनी बांधली. शंकर परशा, नागु सयाजी, सयाजीराव सिलम, नरसिंगराव पुपाला, परशुराम पुपाला, तुल्ला, भुसरथ यासारख्या अनेक सामाजिक सुधारणावादी नेत्यांनी मुंबईच्या एकात्मतेत भर घातली. नरसिंगराव पुपाला मुंबईचे महापौर होते. परशुराम पुपाला यांनी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र समितीच्या लढ्यात स्वतःला झोकून दिले होते. तुल्ला आमदार होते. सयाजीराव सिलम मुंबई काँग्रेसचे अढळ स्तंभ होते. त्यांनी महाराष्ट्र राज्यात अनेक महत्वाच्या भूमिका बजावल्या. महाराष्ट्र विधानसभेचे पहिले अध्यक्ष, पाँडिचेरीचे पहिले नायब राज्यपाल, महाराष्ट्र कुस्तिगीर परिषदेचे अध्यक्ष, समाज शिक्षण समितीचे अध्यक्ष, परळचे एम. डी. काॅलेज व पुणे येथिल अभिनव कला निकेतनचे संस्थापक, वांद्रे येथिल कलानगरची उभारणी ( येथे प्रथमच कलाकार, साहित्यिक आणि पत्रकारांसाठी वसाहत निर्माण करण्यात आली ), हरिजन सेवक संघाचे अध्यक्ष, १९७७ मध्ये जेंव्हा इंडिकेट काँग्रेस नेस्तनाबुत झाली होती तेंव्हा इंदिराजींच्या विनंतीवरुन इंडिकेट काँग्रेसची पुनर्स्थापना केली – तीच आजची काँग्रेस! कामाठीपुरातली एखादी व्यक्ती बाळासाहेबांना भेटावयास गेल्यास त्यास बाळासाहेब लगेच आत बोलवुन घेत. केवळ दोन गल्ल्यांसाठी संपुर्ण कामाठीपुरा वेश्या वस्तीचा आहे असे म्हणणे चुकीचे तर आहेच पण अन्यायकारकही आहे. आंबट शौकिनांना त्या दोन गल्ल्या म्हणजेच संपुर्ण कामाठीपुरा वेश्या वस्तीचा वाटतो. या बदनामीपायी आज क्रांतिकारक, कर्तबगारांच्या या कामाठीपुरात राहुनही मुलांना मुली दिल्या जात नाहीत, नोकर्‍या मिळत नाहीत, बँका कर्ज देत नाहीत, मित्र भेटायला येत नाहीत, समाजात तरुणांना सन्मानाची वागणूक दिली जात नाही.  अल्पसंख्यांकांचे तुष्टीकरण करणार्‍या नेत्यांमुळे कामाठीपुरा अधिकाधिक बकाल होत चालला आहे. बाजारु चित्रपटाद्वारे करोडो रुपये कमावू इच्छिणार्‍या संजय लिला भन्साली यांच्यामुळे अनेक तरुणांचे जीवन उध्वस्त होणार आहे. अनेकांच्या स्वाभिमानी जीवनाला धक्का लागणार आहे. सामान्य जनतेच्या विनाशात भर घालणार्‍या या चित्रपटाला समाजाच्या तळागाळातुन प्रखर विरोध होत आहे. सरकारला जर सामाजिक जाणीव असेल तर सरकारने या चित्रपटावर तात्काळ बंदी आणली पाहिजे. हा चित्रपट डब्यात टाकल्याशिवाय अशा बाजारु निर्मात्यांचे डोळे उघडणार नाही, असेही प्रकाश सिलम यांनी ठणकावून सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.