गोव्यात आज संध्याकाळपासून पुढील 2 म्हणजेच 14 फेब्रुवारीच्या सायंकाळी 6 वाजेपर्यंत कलम 144 लागू
पणजी:-प्रतिनिधी.
आगामी गोवा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात शनिवारी सायंकाळी 6 पासून 14 फेब्रुवारीच्या सायंकाळी 6 वाजेपर्यंत कलम 144 लागू करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाने दिली आहे.
दरम्यान, पाच किंवा जास्त व्यक्ती जमा होण्यास, मिरवणूक, रॅली आयोजित करण्यास किंवा बैठका आयोजित करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. त्याचप्रमाणे पैशांचे आणि दारू वाटण्याचे प्रकार टाळण्यासाठी मतदानाच्या दिवशी निर्वाचन घेतलेली वाहने वगळून उमेदवारांना प्रचारासाठी परवानगी दिलेली सर्व वाहने बंद ठेवण्याचा आदेश दिला आहे. याकाळात खासगी वाहनांचीही तपासणी होईल. निवडणुकीच्या कालावधीत बेकायदेशीर कृत्ये करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
गोव्यातील सर्व परवानाधारक मद्यविक्री दुकाने 12 फेब्रुवारी संध्याकाळी 6 पासून ते 14 फेब्रुवारी पर्यंत बंद राहतील. त्याचबरोबर मतमोजणी 10 मार्च रोजी करण्यात येणार असून या दिवशी देखील गोवा राज्यातील सर्व मद्यविक्री दुकानांना कुलूप असेल, अशी माहिती समोर येत आहे.
पुढील काही दिवसात गोव्यासह पाच राज्यात विधानसभा निवडणुकीचे मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने पाचही राज्यात एक्झिट पोल जाहीर करण्यावर बंदी घातली आहे. ही बंदी 10 फेब्रुवारी रोजी सकाळी 7 ते 7 मार्चच्या सायंकाळी 6:30 पर्यंत आहे.