मुंबई :- प्रतिनिधी.
नरिमन पॉईंट येथील मनोरा आमदार निवासाच्या पुनर्विकासाच्या कामाला डिसेंबर, जानेवारीत सुरुवात करण्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे नियोजन होते.मात्र या संदर्भातील निविदा प्रक्रियाही अद्याप पूर्ण न झाल्याने हे नियोजन कागदावरच राहिले आहे. निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन प्रत्यक्ष काम सुरू होण्यास आणखी किमान सहा महिन्यांचा कालावधी लागणार आहे.
नरिमन पॉइंट येथे १९९४ मध्ये बांधण्यात आलेल्या मनोरा आमदार निवासाची इमारत अतिधोकादायक झाल्याने ती २०१९मध्ये जमीनदोस्त करण्यात आली. या इमारतीच्या पुनर्विकासाची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागावर टाकण्यात आली होती. या विभागाने सुरुवातीला राबवलेल्या निविदा प्रक्रियेला प्रतिसाद न मिळाल्याने फेरनिविदा काढण्यात आली. या फेरनिविदा सप्टेंबर २०२१ मध्ये खुल्या करण्यात आल्या. त्यावेळी बांधकाम क्षेत्रातील तीन नामांकित कंपन्यांनी निविदा सादर केल्या. टाटा, शापूरजी पालनजी आणि एल अॅण्ड टी या तीन कंपन्या या स्पर्धेत आहेत. मात्र, यापैकी कुणाकडे काम सोपवायचे, याबाबत अंतिम निर्णय अद्याप होऊ शकलेला नाही. याविषयी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याला विचारले असता त्यांनी निविदा अंतिम होण्यासाठी आणखी दोन महिन्यांचा कालावधी लागणार असल्याचे सांगितले.
निविदा अंतिम झाल्यानंतर कार्यादेश देत प्रकल्पस्थळी यंत्रसामग्री आणून प्रत्यक्ष काम सुरू करण्यासाठी पुढे आणखी चार महिने लागतील. एकूणच पुढील सहा महिन्यांत मनोरा आमदार निवासाच्या कामाला सुरुवात होईल, अशी माहितीही त्यांनी दिली. निविदा अंतिम करण्यास तसेच काम सुरू करण्यास का वेळ लागत आहे याबाबत या अधिकाऱ्याकडे विचारणा केली असता त्यांनी सागरी हद्द नियंत्रण नियमावलीअंतर्गत (सीआरझेड) परवानगी मिळण्यास वेळ लागत असल्याने इतर बाबी पुढे नेता येत नसल्याचे सांगितले. हा विषय मार्गी लागल्यानंतर आणि पुढील प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर कामाला सुरुवात केली जाईल. यासाठी किमान सहा महिन्यांचा कालावधी अपेक्षित असल्याचेही त्यांनी सांगितले.
पुनर्विकास प्रकल्पाची वैशिष्टय़े:-
▶️१४ मजली इमारतीच्या जागेवर दोन इमारती
▶️एक इमारत २५ मजली तर दुसरी ४० मजली
▶️अंदाजे खर्च ९०० कोटी रुपये
▶️६०० हून अधिक सदनिका
▶️१००० चौ. फूट क्षेत्रफळाच्या सदनिका
▶️सर्व पंचतारांकित सुविधांचा समावेश
▶️टाटा, शापुरजी पालनजी आणि एल अॅण्ड टी या तीन कंपन्या स्पर्धेत

