अशोक अण्णा चराटी हे नेहमी आजरा शहर, तालुका व सहकारी संस्था यांच्या विकासासाठी नेहमीच धडपडत करतात.- नाम. प्रकाश आबिटकर
( मोफत महाआरोग्य शिबिरास उस्फूर्त प्रतिसाद..)
आजरा.- प्रतिनिधी.

आजरा नगरपंचायतचे नगराध्यक्ष व अण्णाभाऊ संस्था समूहाचे प्रमुख अशोकअण्णा चराटी यांचा ७० वा वाढदिवस महाआरोग्य शिबिराने उत्साह संपन्न होतो. व अनेक नागरिकांना याचा लाभ घेता आला. सोबत अण्णांना नेहमीच विकास कामाची तळमळ असते. सामान्य माणसाचे आयुष्य फुलवण्यासाठी नेहमीच त्यांची धडपड असतात, असे प्रतिपादन राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले. ते अशोक अण्णा चराटी यांच्या वाढदिवसानिमित्त वाढदिवस गौरव समितीने आयोजित केलेल्या शुभेच्छा कार्यक्रमात ते बोलत होते.

माजी राज्यमंत्री भरमु अण्णा पाटील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, आमदार शिवाजीभाऊ पाटील, वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष अशोक स्वामी, भाजपाचे जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. अशोक अण्णा चराटी यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र राज्य शासनाच्या आरोग्य विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या मोफत महाआरोग्य शिबिरास मोठा प्रतिसाद मिळाला. तसेच चराटी यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी चराटी यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.

महाराष्ट्र राज्य शासनाच्या आरोग्य विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या मोफत महाआरोग्य शिबिराचा शुभारंभ आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, अशोक अण्णा चराटी व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी गरजू रुग्णांना चष्मे व श्रवण यंत्र वाटप करण्यात आले. स्वागत व प्रास्ताविक आजरा अर्बन बँकेचे संचालक विजय पाटील यांनी केले. वाढदिवसानिमित्त अशोक अण्णा चराटी यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार व केक कापण्यात आला. यावेळी नाम श्री. आबिटकर पुढे म्हणाले, अशोक अण्णा चराटी हे नेहमी आजरा शहर, तालुका व सहकारी संस्था यांच्या विकासासाठी नेहमी धडपडत असतात.

त्यांच्याच आग्रहामुळे आजर्याला नगरपंचायत मिळाली आहे. आजरा शहराची पाणी योजना, नगरपंचायत इमारत, क्रीडा संकुल यांचे लवकरच लोकार्पण होणार आहे. त्याचबरोबर शहरातील नाट्य ग्रहाच्या कामालाही लवकरच सुरुवात होणार आहे. आजरा तालुक्यात तीन धरणे झाले आहेत, मात्र अद्यापही अनेक शेतापर्यंत पाणी पोहोचले नाही. या पाण्याच्या नियोजनासाठी लवकरच अधिकारी व लोकप्रतिनिधी यांची संयुक्त बैठक घेण्यात येईल. तालुक्याच्या विकासाच्या ज्या अपेक्षा आहेत, त्या पूर्ण करण्यासाठी नेहमी कटिबद्ध आहे.

राजकीय चढ-उतार येत राहतील पण काम करत राहा, तरच उत्तुंग यश मिळवता येईल. अनेक जण वाढदिवस साजरा करतात, मात्र अशोक अण्णांच्या वाढदिवसानिमित्त मोफत महाआरोग्य शिबिर हा उपक्रम स्तुत्य आहे. नागरिकांना आरोग्य सेवेचा लाभ मिळवून देण्यासाठी साऱ्यांनी काम करूया असे आवाहनही मंत्री आबिटकर यांनी केले.

चंदगड विधानसभेचे आमदार शिवाजीभाऊ पाटील म्हणाले, आजरा तालुका विधानसभेला एकाच मतदारसंघाला जोडला जावा. अशोक अण्णा चराटी हे आमदार व्हावेत हीच वाढदिवसानिमित्त सदिच्छा. आजरा, चंदगड, राधानगरी तालुके पर्यटन तालुके म्हणून घोषित व्हावे यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.

💥माझे इथून पुढचे आयुष्य ही जनतेसाठीच .- अशोक अण्णा चराटी.
वाढदिवसानिमित्त सत्काराला उत्तर देताना अशोक अण्णा चराटी म्हणाले, आजरा शहरातील पाणी योजना व क्रीडा संकुल लवकरच पूर्णत्वास जाणार आहे. पालकमंत्री आबिटकर यांनी आजरा शहर व तालुक्यासाठी मोठ्या प्रमाणावर निधी दिला आहे. त्या माध्यमातून विकास कामांना गती मिळाली आहे. आत्तापर्यंत समाजासाठी काम करत आलो आहे, इथून पुढचे आयुष्य ही जनतेसाठीच समर्पित करणार आहे.

अध्यक्ष स्थानावरून बोलताना माझी राज्यमंत्री भरमु पाटील म्हणाले, श्री .चराटी यांच्यासारख्या कार्यकर्त्यांच्या सहकार्याशिवाय आमदार, मंत्री झालो नसतो. जनतेचा विकास करण्याचे, समाजहिताचे काम करण्यासाठी साऱ्यांनी नेहमी प्रयत्न करावेत असे आवाहन त्यांनी केले.

भाजपचे जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील म्हणाले, अशोक अण्णा चराटी हे वयाचे भान न ठेवता, तब्येतीची काळजी न करता समाजासाठी नेहमी काम करत असतात. तालुका व जिल्हा आरोग्य संपन्न व्हावा. यासाठी महाआरोग्य शिबिरे कायम पणे व्हावीत. आजरा साखर कारखान्याचे अध्यक्ष मुकुंद देसाई म्हणाले, प्रत्येक प्रश्नासाठी अशोक अण्णा पोट तिडकीने काम करतात. स्व. अण्णा व स्व. भाऊ यांच्या पश्चात संस्था सक्षम व नावारूपाला आणण्याचे काम अशोक अण्णा यांनी केले.


यावेळी आजऱा तहसीलदार समीर माने, चंदगडचे नगराध्यक्ष सुनील काणेकर, गोड साखरचे अध्यक्ष प्रकाश पताडे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सतीश पाटील, माजी सभापती विष्णुपंत केसरकर, आजरा साखर संचालक उदयराज पवार, रणजीत देसाई, आरोग्य सेवा उपसंचालक डॉ. दिलीप माने, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सरिता थोरात, वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमोल पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. रवींद्र गुरव, आजरा बँकेचे माजी अध्यक्ष सुरेश डांग, रमेश कुरुणकर, आजऱ्याच्या उपनगराध्यक्ष पूजा डोंगरे, नगरसेविका अश्विनी चव्हाण, डॉ. स्मिता कुंभार, माजी नगराध्यक्ष ज्योत्स्ना चराटी, आजरा बँकेचे उपाध्यक्ष संजय चव्हाण, संचालक सिद्धेश नाईक, जयवंत सुतार, पंचायत समिती सदस्य, राजू होलम, रमेश रेडेकर, योगेश पाटील, दशरथ अमृते, सुधीर कुंभार, मारुती मोरे, इंद्रजीत देसाई, संतोष भाटले, सुनील दिवेकर, विजय थोरवत, के व्ही. येसणे, योगेश पाटील, रणजीत सरदेसाई, दिलावर चांद,
यांच्यासह अण्णाभाऊ संस्था समूहातील विविध संस्थांचे पदाधिकारी, संचालक, नागरिक उपस्थित होते. डॉ. अशोक बाचुळकर यांनी सूत्रसंचालन केले. विलास नाईक यांनी आभार मानले.




