कारखान्याच्या चिमणीतून काळी राख व धुराचे कण गावात ; गवसे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात.
( प्रदूषण नियंत्रण यंत्रणा तपासून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी.)
आजरा :- प्रतिनिधी.

आजरा गवसे येथील वसंतराव देसाई शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या चिमणीतून बाहेर पडणारी काळी राख व धुराचे कण वाऱ्याच्या दिशेने गवसे गावातील लोकवस्तीमध्ये येत आहेत.

सदर राख घराच्या परिसरात, अंगणात व पिण्याच्या पाण्यात तसेच अन्नपदार्थांवर पडत आहे. त्यामुळे ही राख श्वासावाटे, अन्नावाटे व पाण्यावाटे मानवी शरीरात जात असून ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

तसेच परिसरातील हवा व पाणी प्रदूषित होत असून लहान मुले, ज्येष्ठ नागरिक व सर्व ग्रामस्थांना याचा त्रास सहन करावा लागत आहे.

या गंभीर समस्येची तातडीने दखल घेऊन कारखान्याच्या चिमणीतील प्रदूषण नियंत्रण यंत्रणेची तपासणी व आवश्यक दुरुस्ती करावी, तसेच चिमणीतून बाहेर पडणारी काळी राख व धुराचे कण गावात पसरणार नाहीत यासाठी योग्य त्या उपाययोजना तातडीने कराव्यात, अशी मागणी गवसे गावातील सर्व ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे.

याबाबत ग्रामस्थांनी दि. १३/११/२०२६ रोजी कारखान्याचे कार्यकारी संचालक यांना लेखी अर्ज दिला आहे. अन्यथा भविष्यात ग्रामस्थांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे या अर्जाची गांभीर्याने दखल घेऊन त्वरित कार्यवाही करावी, असेही अर्जात म्हटले आहे.
या निवेदनावर मारुती डोंगरे, सचिन पाटील, अविनाश हेब्बाळकर, गिरीश सूर्याजी, संतोष पाटील, सहदेव नेगवे, महादेव पाटील, रवींद्र दिवेकर, शिवराज पाटील, मॅक्वीन फर्नांडिस, दिगंबर पाटील, गजानन पाटील, मिल्टन फर्नांडिस, आकाश पाटील, पांडुरंग पाटील, सर्जेराव हेबाळकर, रमेश पाटील, स्वप्निल पाटील उदय चौगुले, छोटू भावल्या समीर आदींच्या सह्या आहेत.



