आजरा. प्रतिनिधी.
आजरा येथील आजरा अर्बन बँक आयोजित कृषी व अन्नप्रक्रिया उद्योगांमधील सूक्ष्म उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रधानमंत्री कृषी व अन्नप्रक्रिया उद्योग योजना कार्यान्वित झाली आहे. या योजने अंतर्गत असंघटीत उद्योगांना ३५% इतके अनुदान केंद्र शासना मार्फत मिळणार आहे. केवळ अनुदान एवढ्या पुरता हा विषय मर्यादीत न राहता या उद्योगांना सक्षमपणे उभे राहण्यासाठी प्रकल्प अहवाल तयार करण्यापासून ते ब्रॅंडींग आणि विपणन यासाठी देखील सहाय्यभूत साखळी तयार करण्याचे काम या योजने मार्फत होणार आहे. प्रत्येक जिल्हयासाठी विशिष्ट उत्पादन निश्चित केले आहे. याशिवाय अन्य उत्पादनासाठी आणि सध्या चालू असलेल्या उद्योगांसाठी व्यवसाय वाढ, आधुनिक तंत्रज्ञान सुधारणा इत्यादी बाबींसाठी ही योजना उपयुक्त ठरणार आहे. बहुराज्यीय असणारी दि आजरा अर्बन कोऑपरेटीव्ह बँक आपल्या ३२ शाखांद्वारे या उद्योगांना नेहमीच आधार देणारी ठरलेली आहे. या उद्योगांना पाठबळ देण्यासाठी आणि या योजनेची संपूर्ण माहिती देण्यासाठी दि. २२ डिसेंबर २०२१ रोजी सकाळी ११.०० वाजता अण्णा भाऊ सांस्कृतिक हॉल, आजरा येथे उद्योजक मेळावा आयोजीत केला आहे. या मेळाव्यास मार्गदर्शन करण्यासाठी मा.विभागीय कृषी सह-संचालक उमेश पाटील, कोल्हापूर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानदेव वाकुरे, तालुका कृषी अधिकारी श्री.मोमीन हे उपस्थित राहणार आहेत. अण्णा भाऊ संस्था समूह प्रमुख अशोक चराटी, आजरा बँकेचे अध्यक्ष डॉ.अनिल देशपांडे, उपाध्यक्ष किशोर भुसारी, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत गंभीर आणि सर्व संचालक मंडळ यांनी जिल्ह्यातील उद्योजकांना माहिती आणि शंका समाधान करून घेण्यासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
