गुलबर्गा . (प्रतिनिधी)
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ए.सी.बी.) कर्नाटक राज्यात ६८ ठिकाणी एकाच वेळी छापे टाकले.
घराच्या छतावर आणि ड्रेनेज पाईप्सवर ठेवलेले ५० लाख रुपयांपेक्षा जास्त नोटांचे बंडल ए.सी.बी. अधिकाऱ्यांनी यावेळी जप्त केले.
ए.सी.बी.च्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,
साड्यांमध्येही नोटा लपविल्या गेल्या होत्या.
अधिकाऱ्यांनी कलबुर्गी येथील कनिष्ठ अभियंता शांता गौरा बिरादार यांच्या निवासस्थानावर छापा टाकला,
ज्यामध्ये बाथरूमला लागून असलेल्या घराच्या ड्रेनेज पाईपमध्ये १३.५० लाख रुपयांच्या चलनी नोटांचे बंडल सापडले.
त्यांच्याकडून घराच्या छतावरून १५ लाखांची रोकडही जप्त करण्यात आली.
या कनिष्ठ अभियंत्याच्या घरातून एकूण ५५ लाखांहून अधिक रक्कम जप्त करण्यात आली आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने कर्नाटकातील कुलबुर्गी येथील एका पी.डब्ल्यू.डी. विभागाच्या अभियंत्याच्या घरावर छापा टाकला होता.
लाचखोर अभियंत्याने घरातील ड्रेनेज पाईपमध्ये ५०० रुपयांच्या नोटांचे बंडल लपवले होते. कारवाई दरम्यान पाईपमधून नोटा बाहेर पडू लागल्यावर तिथे उपस्थित असलेले सर्वजण थक्क झाले.
अधिकाऱ्यांनी पाईपमधून नोटा गोळा करण्यासाठी त्याखाली बादली धरली होती.
नोटा इतक्या होत्या की बादल्या भरल्या,
पण नोटा संपल्या नाहीत. अहवालानुसार,
आरोपी अभियंत्याच्या घरातून ५५ लाख रुपये रोख जप्त करण्यात आले आहेत.
पी.डब्ल्यू.डी. विभागाच्या अधिकाऱ्याच्या निवासस्थानाच्या पाईपलाईनमध्ये रोख रक्कम लपवण्यात आल्याचे सूत्रांकडून ए.सी.बी. अधिकाऱ्यांना सांगण्यात आले होते.
अधिकाऱ्यांनी छापा टाकून एका प्लंबरला बोलावून पाईपलाइन उघडली आणि आत लपवलेल्या नोटा बाहेर काढल्या.
या घटनेचा एक व्हि.डि.ओ.ही समोर आला आहे,
ज्यामध्ये अधिकारी आणि प्लंबर पाईपचे काही भाग वेगळे करताना दिसत आहेत.
या पाईप्समधून पुन्हा नोटा काढण्यात आल्या.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने राज्यभरात केलेल्या राज्यव्यापी कारवाईचा हा केवळ एक भाग होता.
यादरम्यान ब्युरोने बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी १५ अधिकाऱ्यांविरुद्ध ६८ ठिकाणी छापे टाकले.
ए.सी.बी.ने नुकताच बंगळुरू विकास प्राधिकरणाच्या कार्यालयावरही छापा टाकला होता.
दरम्यान, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सादर केलेल्या अहवालाच्या आधारे राज्य सरकार कारवाई करेल,
असे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगितले आहे.
नुकतेच एका प्रश्नाच्या उत्तरात मुख्यमंत्र्यांनी राज्य सरकार कोणत्याही स्वरूपाचा भ्रष्टाचार खपवून घेणार नाही,
असे सांगितले होते.
आमचे सरकार कठोर कारवाई करेल आणि भ्रष्टाचारात दोषी आढळणाऱ्यांना वाचवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असे बोम्मई म्हणाले.