आजरा प्रतिनिधी. २४
कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक लवकर घ्यावी, अशी याचिका मडिलगे (आजरा) येथील युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अनिकेत कवळेकर यांच्या शंकरलिंग विकास संस्थेने उच्च न्यायालयात दाखल केली होती . यावर गुरुवारी (दि. २५) सुनावणी होऊन निवडणूक प्रक्रिया तात्काळ सुरू करण्यात यावी असे आदेश मा. उच्च न्यायालयाने दिल्याने जिल्हा बँकेच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. विधान परिषदेच्या मतदाना पाठोपाठ जिल्हा बँकेचे मतदान होणार असल्याने राजकीय हालचाली वेगावल्या आहेत.जिल्हा बँकेची अंतिम मतदार यादी २७ सप्टेंबरला प्रसिद्ध झाली होती. त्यानंतर दहा ते वीस दिवसात प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम जाहीर होणे अपेक्षित होते. परंतु निवडणूक प्रक्रिया लांबल्याने याबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल करून दाद मागण्यात आली होती. या याचिकेवर
सुनावणीचे कामकाज पूर्ण होऊन याबाबत न्यायालयाने सहकार विभागाला म्हणणे सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार आज-याचे सहायक निबंधक एस. व्ही. पाटील यांनी न्यायालयात सोमवारी म्हणणे सादर केले.गुरुवारी सुनावणी झाली. मा. उच्च न्यायालयाच्या निकालानंतर तातडीने सदर निवडणूक कार्यक्रम सुरू होणार असल्याचे समजते.