सिंधुदुर्ग:-प्रतिनिधी.
एसटी कामगारांचा संप मिटण्याची शक्यता नसतानाच आता एसटी प्रशासनाकडून हळूहळू संपात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांवर कारवाई तीव्र होऊ लागली आहे. यापूर्वी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 17 एसटी कर्मचाऱ्यांचे निलंबन केल्यानंतर आज गुरुवारी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अजून 15 एसटी कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आल्याची माहिती विभागीय नियंत्रक प्रकाश रसाळ यांनी दिली. त्यामुळे संपकरी एसटी कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. या निलंबना मध्ये कणकवली विभागीय कार्यशाळेतील 8 कर्मचारी तर कुडाळ आगारातील 1 व सावंतवाडी आगारातील 6 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. अशी माहिती श्री रसाळ यांनी दिली.
आतापर्यंत संपात सहभागी झाल्याबद्दल निलंबनाची कारवाई केलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या आता 32 वर जाऊन पोहोचली आहे. तसेच रोजंदारीवर असलेल्या 152 एसटी कर्मचाऱ्यांनाही यापूर्वी 24 तासात कामावर हजर व्हा अन्यथा कारवाईला सामोरे जा अशी नोटीस बजावण्यात आली आहे. जिल्ह्यातील एसटी आगारातून अहवाल येईल त्यानुसार ही कारवाई तीव्र करण्यात येणार असल्याचे संकेतही प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.
