मुंबई. प्रतिनिधी. १२
महाराष्ट्राच्या सीमेला लागून असलेल्या कर्नाटक, गोवा, गुजरात आणि मध्य प्रदेश या राज्यांमध्ये स्थानिक राज्य शासनाने इंधनावरील करात मोठी कपात केली आहे. परिणामी, महाराष्ट्राच्या तुलनेत शेजारी राज्यांमध्ये पेट्रोल व डिझेल बर्याच स्वस्तात उपलब्ध होत असल्याने महाराष्ट्रातील खासगी आणि मालवाहतूक करणारी वाहने सीमेबाहेर जाऊन पेट्रोल व डिझेल भरणा करत आहेत.
ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसचे बाल मल्कित सिंह यांनी सांगितले की, राज्य शासन पेट्रोल, डिझेलवरील कर कमी करत नसल्याने सीमेवर राहणारे नागरिक आणि एका राज्यातून दुसर्या राज्यात मालवाहतूक करणारी वाहने शेजारच्या राज्यांतील पेट्रोल पंपांवर जाऊन इंधन भरू लागली आहेत.त्यामुळे या राज्यांमधील सीमेजवळच्या पेट्रोल पंपांवरील इंधनाची विक्री तब्बल 50 टक्क्यांनी वाढल्याचेही त्यांनी सांगितले. महाराष्ट्रात करकपात होऊन पेट्रोल, डिझेलची स्वस्ताई येत नाही तोपर्यंत शेजारी राज्यांतील पेट्रोल पंपांचाच धंदा जोरात चालणार, असे ते म्हणाले.
सिंधुदुर्गात पेट्रोलचे दर 111.89 रुपये असून गोव्यामध्ये पेट्रोलचे दर 84.80 रुपये प्रतिलिटर आहे. सिंधुदुर्गमध्ये डिझेलचा दर 94.63 रुपये प्रतिलिटर असून गोव्यामध्ये डिझेलचा दर 81.20 रुपये इतका आहे.
महाराष्ट्राच्या तुलनेत गोव्यात पेट्रोल तब्बल 25 रुपयांनी, तर डिझेल 12 रुपयांनी स्वस्त आहे.
