मुंबई :- प्रतिनिधी. ११
अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांचे अंडरवर्ल्डसोबत संबंध असल्याचा आरोप विधानसभा विरोधी पक्षनेते श्री. देवेंद्र फडणवीस यांनी केला. या आरोपामुळे मुंबईसह महाराष्ट्रात तीव्र पडसाद उमटलेले पाहायला मिळत आहेत. मुंबई भाजपाकडून नरिमन पॉइंट येथील भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यालय परिसरात कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले आणि त्यांच्या विरोधात घोषणा दिल्या गेल्या. नवाब मलिक यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी मुंबई भाजपा अध्यक्ष व आमदार श्री. मंगल प्रभात लोढा यांनी केली.
भाजपा मुंबई अध्यक्ष व आमदार श्री. मंगल प्रभात लोढा यांच्या नेतृत्वाखाली मंत्री नवाब मलिक यांच्या वरोधात आंदोलन करत प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. मंत्री नवाब मलिक यांच्याविरोधात तिघाडी सरकारच्या खोट्या मंत्र्याचा जाहीर निषेध! अश्या घोषणा देत भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यालय परिसर दणाणून सोडला.मंगलजी म्हणाले की, विधानसभेतील विरोधी पक्षनेते माननीय श्री. देवेंद्र फडणवीस यांच्यावर व त्यांच्या कुटुंबावर मंत्री नवाब मलिक बिनबुडाचे आरोप करत आहेत. त्यांचा हा अपमान भाजपचा कोणताही कार्यकर्ता सहन करणार नाही.प्रसारमाध्यमांच्या माध्यमांतून खोटे व तथ्यहीन आरोप करत असुन हे राजकारणाला काळीमा फासणारे कृत्य आहे अशी टीका मंगलजी यांनी केली.यावेळी मुंबई भाजपा उपाध्यक्ष श्री. आचार्य पवन त्रिपाठी, आमदार श्री.राहुल नार्वेकर, मुंबई भाजपा सचिव प्रतिक कर्पे, दक्षिण मुंबईचे जिल्हाध्यक्ष श्री. शरद चिंतनकर, भायखळा विधानसभा मंडल अध्यक्ष श्री. नितीन बनकर तसेच इतर भाजपा नेते पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.