शासकीय मेडिकल कॉलेज त्रुटींच्या पूर्ततेसाठी आम्ही नेहमी सहकार्याला तत्पर.
सिंधुदुर्ग :- प्रतिनिधी. ०९
सिंधुदुर्गात सत्ताधाऱ्यांचा गलथान कारभार सुरू असून सत्ताधारी केवळ राजकारण करत आहेत. कोरोना काळात सिंधुदुर्ग रेड झोनमधून हळूहळू पूर्वपदावर येत आहे. 3 नोव्हेंबर पासून आजपर्यंत 2 हजार आरटीपीसीआर टेस्ट केल्या आहेत. मात्र त्याचे रिपोर्ट अद्याप मिळालेले नसल्याचा गौप्यस्फोट आमदार नितेश राणे यांनी पत्रकार परिषदेत केला. कर्मचाऱ्यांचे पगार झाले नसल्यामुळे टेस्ट रिपोर्ट मिळालेले नाहीत. प्रशासनाकडून दररोज कोरोना टेस्ट चा दिला जाणारा आकडा बोगस आहे. 2 हजार टेस्ट चे रिपोर्ट मिळाले नसले तरी टेस्ट झालेले 2 हजार नागरिक समाजात फिरत आहेत. यातील ज्यांचे पॉझिटिव्ह रिपोर्ट येतील आणि त्याचा संसर्ग इतरांना झाला तर त्याला जबाबदार कोण ? असा खडा सवाल आमदार नितेश राणे यांनी केला. कुठलीही लपवाछपवी न करता या 2 हजार टेस्टरिपोर्ट बाबत सत्य माहिती प्रशासनाने जनतेसमोर ठेवावी अशी मागणीही आमदार नितेश यांनी केली. 16 नोव्हेंबर च्या डीपीडिसी मिटिंगमध्ये पालकमंत्र्यांना घाम फोडणार असल्याचे सांगत आमदार नितेश यांनी डिपीडिसी मिटिंग वादळी होणार असल्याचे संकेत दिले.
शासकीय मेडिकल कॉलेज मान्यतेसाठी आमची मदत घ्या
शासकीय मेडिकलच्या नावाने गवगवा करताना केंद्र शासनाने परवानगी नाकारली तर मात्र राणे केंद्रात मंत्री असल्यामुळे शासकीय मेडिकल कॉलेज ला परवानगी नाकारल्याचा कांगावा शिवसनेनेचे नेते करत आहेत. केंद्राच्या समितीने परवानगी नाकारताना अधिकृत प्रोफेसर वर्गातील स्टाफ न भरल्याचे कारण नमूद केले आहे. कोल्हापूर येथील प्रोफेसर डेप्युटशन वर सिंधुदुर्ग शासकीय मेडिकल कॉलेजमध्ये दाखविण्यात आले आहेत. मेडिकल कॉलेजच्या नावाने राजकारण करण्यापेक्षा खासदार विनायक राऊत यांनी केंद्र कमिटीने दाखविलेल्या त्रुटींची पूर्तता करावी.शासकीय मेडिकल कॉलेज हे जनतेचे आहे. स्वतःच्या मालकीचे असल्यासारखे वागण्यापेक्षा गव्हरमेंट मेडिकल कॉलेज आहे याचे भान ठेवा आणि त्रुटींची पूर्तता करा. शासकीय मेडिकल कॉलेज सुरू झाल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्याचाच फायदा होणार आहे. शासकीय मेडिकल कॉलेज उभारण्यासाठी लागणारी तांत्रिक माहिती आम्ही देण्यास तयार आहोत. आमच्या अनुभवाचा फायदा घेण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी आमच्यासोबत जॉईंट मिटिंग घ्यावी.जेणेकरून शासकीय मेडिकल कॉलेज लवकर सुरू होईल. खासदार विनायक राऊत हे दिल्लीत केवळ निवेदनाचे फोटो मीडियाला देण्याशिवाय आणखी काही करू शकत नाहीत अशी टीकाही आमदार नितेश राणेंनी केले.
जिल्हा नियोजन बैठकीत पालकमंत्र्यांना घाम फोडणार.
आम्ही आव्हान दिले म्हणून तरी डीपीडिसी ची मिटिंग लावली आहे. डीपीडिसी ची मिटिंग खेळीमेळीच्या वातावरणात होणार नाही असा इशाराच आमदार नितेश राणे यांनी दिला. पालकमंत्री हे डीपीडिसी चे मालज नाहीत.डीपीडिसी चा निधी वाटप सर्व सदस्यांना विश्वासात घेऊन करणे हे पालकमंत्र्यांचे कर्तव्य आहे. डीपीडिसी निधी वाटपात पालकमंत्री राजकारण करत आहेत.डीपीडिसी मीटिंगमध्ये पालकमंत्र्यांना घाम फोडणारच असा इशारा देत आमदार नितेश राणे यांनी पालकमंत्र्यांनी रात्रीचा जेवणाचा डबाही आणावा अशा शब्दांत आगामी डीपीडिसी मिटिंग ची झलक आमदार नितेश राणेंनी बोलून दाखवली.