मुंबई. प्रतिनिधी. २८.
गेल्या तीन दिवसांपासून मुंबई उच्च न्यायालयात जामीन अर्जावर सुनावणी झाल्यानंतर अखेर आज आर्यन खान आणि त्याच्यासोबत अरबाज मर्चंट आणि मुनमुन धामेचा यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. मात्र, तरीदेखील आर्यन खानला आज तुरुंगातच राहावं लागणार आहे. आर्यन खानची बाजू उच्च न्यायालयात मांडणारे वकील मुकुल रोहतगी आणि सतीश मानेशिंदे यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. त्यामुळे उद्या संध्याकाळपर्यंत आर्यन खान तुरुंगाबाहेर येऊ शकतो.
आर्यन खानच्या वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार, न्यायालयाने दिलेल्या सविस्तर आदेशाची प्रत आणि त्याचा ऑपरेटिव्ह पार्ट उद्या हाती येणार आहेत. ते जेल प्रशासनाला दिल्यानंतरच आर्यन खानची सुटका होऊ शकणार आहे. आत्ताच जामीन मंजूर झाल्याचा निर्णय न्यायालयाने दिला असल्यामुळे ही कागदपत्रांची प्रक्रिया पूर्ण व्हायला वेळ लागू शकतो.
दरम्यान, कोणत्याही आरोपीच्या जामीन अर्जावर निर्णय आला आणि त्या आरोपीला जामीन मंजूर झाला, तर त्यासंदर्भातला कोर्टातला आदेश आणि ऑपरेटिव्ह जेलबाहेर लावण्यात आलेल्या पेटीमध्ये टाकावे लागतात. जेलबाहेरच्या या पेट्या रोज सकाळी साधारणपणे ८ वाजता आणि संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास उघडतात. आजची ही वेळ गेल्यामुळे आता उद्या सविस्तर निकालाची प्रत आणि कागदपत्र हाती आल्यानंतर ते तुरुंग प्रशासनाला दिल्यानंतरच आर्यन खान बाहेर येऊ शकणार आहे.
