Home कोंकण - ठाणे सह्याद्रीच्या रक्षणासाठी ‘पारगड ते रायगड जागरण यात्रा.- ३० नोव्हेंबर पासून पारगड ते...

सह्याद्रीच्या रक्षणासाठी ‘पारगड ते रायगड जागरण यात्रा.- ३० नोव्हेंबर पासून पारगड ते पन्हाळगड पहिला टप्पा.

Oplus_131072

सह्याद्रीच्या रक्षणासाठी ‘पारगड ते रायगड जागरण यात्रा.- ३० नोव्हेंबर पासून पारगड ते पन्हाळगड पहिला टप्पा.

आजरा- प्रतिनिधी.

कर्जत येथे भीमाशंकरच्या अभयारण्यालगत होणाऱ्या टोरंटो प्रकल्पा पाठोपाठ महाराष्ट्रात प्रस्तावित असलेल्या ३० पंप स्टोरेज प्रकल्पापैकी कांहीठिकाणी स्थानिक जनतेचा विरोध डावलून जबरदस्तीने प्रकल्पांचे बांधकाम सुरु केले आहे. तर कांही प्रकल्प मंजुरीच्या अंतिम टप्प्यात आहेत. त्यातील सर्वात जास्त प्रकल्प हे पश्चिम घाटात उभा केले जाणार आहेत. हे संकट केवळ भीमाशंकर पुरते मर्यादित नसून ते आता आपल्या दारापर्यंत आले आहे.

धामापूर ता. चंदगड येथे होणाऱ्या पंप स्टोरेज प्रकल्पासाठी चंदगड तालुक्यातील २९५ तर आजरा तालुक्यातील १७० हेक्टर जंगलाची तोड केली जाणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यातच असे चार प्रकल्प उभा केले जाणार असून हे प्रकल्प सह्याद्रीच्या अति संवेदनशील भागात येतात. जैवविविधता आणि पर्यावरणाचे अतोनात नुकसान या प्रकल्पांच्यामुळे होणार असून दक्षिण भारताचा जलस्त्रोत असलेला पश्चिम घाट उध्वस्त होणार आहे. भविष्यात फार मोठ्या भयावह अशा दुष्काळाला आणि पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार आहे. म्हणूनच सह्याद्रीच्या रक्षणासाठी ‘पारगड ते रायगड जागरण यात्रा’ ३० नोव्हेंबरला सुरु करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. या यात्रेत महाराष्ट्रातील पर्यावरण तज्ञ, सामाजिक राजकीय कार्यकर्ते, लेखक, कवी, कलावंतांसह सजग नागरिक व पर्यावरणप्रेमीना आम्ही निमंत्रित करणार आहोत.


सह्याद्री म्हणजेच पश्चिम घाटाचे पर्यावरणीय महत्व आपण सर्व जाणताच. जैवविविधतेने समृध्द असलेला हा परिसर म्हणजे अनेक दुर्मिळ अशा पशु, पक्षी, प्राणी आणि वनस्पतींचा अधिवास आहे. निसर्गाला पूरक अशी जीवनशैली इथल्या माणसाने विकसित केली आहे. पश्चिम घाटाला जसां पर्यावरणीय वारसा आहे तसाच समृध्द असा सामाजिक, सांस्कृतिक वारसाही आहे. रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्य याचं सह्याद्रीच्या मदतीने विस्तारले. स्वाभिमानाची नवी संस्कृती इथेच विकसित झाली. आज नवनवे प्रकल्प सह्याद्रीच्या बोकांडी बसवून या साऱ्यावर वरवंटा फिरवला जात आहे. एका बाजूला न भरून येणारी पर्यावरणाची हानी तर दुसऱ्या बाजूला छत्रपती शिवरायांचा समृध्द इतिहास पुसला जाणार आहे. म्हणूनच सह्याद्रीच्या रक्षणासाठी पारगड ते रायगड अशी जागरण यात्रा निघणार असून त्याचा पहिला टप्पा ३० नोव्हेंबर ते २ डिसेंबर या तारखेपर्यंत पारगड ते पन्हाळा असा होणार आहे.
ही यात्रा बरेच दिवस चालणार असून त्याचा पहिला टप्पा पारगड ते पन्हाळगड असा होणार आहे. या यात्रेत महाराष्ट्रातील अनेक लोकांना सहभागी करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील रहाणार आहोत. तरी जिल्ह्यातील व राज्यातील पर्यावरण प्रेमीनी या जागरण यात्रेत मोठया संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन आज झालेल्या पत्रकार परिषदेत निमंत्रक कॉ. संपत देसाई, प्रा सुनील शिंत्रे यांनी केले.

यावेळी संदीप देसाई, कृष्णा भारतीय, कॉ शांताराम पाटील, प्रकाश मोरुस्कर, युवराज पोवार, नामदेव फगरे, विजय कांबळे, नारायण भडांगे, दशरथ घुरे यांच्यासह आजरा भुदरगड तालुक्यातील कार्यकर्ते उपस्थित होते.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.