ज्योतिप्रसाद सावंत (कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी. )
ऐन जिल्हा बँक निवडणुकीच्या तोंडावर आजरा तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत कलह पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला असून राष्ट्रवादीचे जिल्हा परिषद उपाध्यक्ष जयवंतराव शिंपी यांनी जिल्हा बँक निवडणुकीमध्ये थेट अशोकअण्णा चराटी यांना पाठिंबा जाहीर केला आहे.शिंपी यांच्या या निर्णयाने चराटी गटाला निश्चितच बळ मिळाले आहे, तर राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून सावध पवित्रा घेतला जात आहे .आजरा सूतगिरणी कार्यस्थळी नुकत्याच झालेल्या ठराव धारकांच्या मेळाव्यात यावर अधिकृतरित्या शिक्कामोर्तब करण्यात आले आहे .
चराटी गट व शिंपी गट हे तालुक्यातील पारंपारिक विरोधी गट म्हणून ओळखले जातात.गेल्या काही महिन्यांपासून अशोकअण्णा चराटी यांनी घेतलेले सबुरीचे धोरण व राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून शिंपी गटाची गळचेपी होत असल्याचा केला जाणारा आरोप याची परिणीती अखेर शिंपी व चराटी गटाच्या मनोमिलनात झाली आहे.गतवेळी जयवंतराव शिंपी विरूध्द अशोकअण्णा चराटी अशी लढत झाली होती यावेळी मात्र पुढील राजकीय दिशा ठरवून दोघांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला.जिल्हा बँकेपाठोपाठ आजरा साखर कारखाना, जनता सहकारी बँक,तालुका खरेदी विक्री संघ , जिल्हा परिषद, पंचायत समिती नगरपंचायत यासह तालुक्यातील अनेक प्रमुख सहकारी संस्था व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा धुरळा उडणार आहे . तालुक्यामध्ये प्रत्येक गावात शिंपी व चराटी यांचे स्वतंत्र गट आहेत .जिल्हा बँक निवडणुकीच्या निमित्ताने हे दोन गट जर एकत्र आले तर भविष्यातील अनेक राजकीय समीकरणे बदलणार आहेत .
शिंपी व चराटी एकत्र आल्याने हा राष्ट्रवादीच्या दृष्टीने धोक्याचा इशारा समजला जातो.जिल्हा बँकेतील राजकीय खेळ्यामध्ये मुरब्बी असणारे हे दोन्ही गट आहेत .भविष्यात आजरा साखर कारखान्यांसह जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्ये चराटी गटाकडून जयवंतराव शिंपी गटाला पुढे चाल देण्यात येईल व आजरा नगरपंचायतीमध्ये हे दोन्ही गट एकत्र राहून निवडणुकीला सामोरे जातील असे सध्या तरी दिसत आहे . शिपिंच्या मदतीने अशोकअण्णांचे सुपुत्र अनिकेत चराटी यांची तर अशोकअण्णांच्या सहकार्याने जयवंतराव शिंपी यांचे चिरंजीव अभिषेक शिंपी यांचीही राजकीय वाटचाल सुलभ होण्यास मदत होणार आहे. आता राष्ट्रवादी कॉंग्रेस काय चाल चालणार? याकडे आजरा तालुकावासियांचे लक्ष लागुन आहे.
