नवी दिल्ली – वृतसंस्था.
आजपासून पुढील तीन आठवडे म्हणजे ७ ऑक्टोबरपर्यंत भारतीय जनता पार्टीने मोदींच्या वाढदिवसानिमित्त वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केलं आहे. या कालावधीमध्ये करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे सरकार आणि पक्षासंदर्भात निर्माण झालेले नकारात्मक वातावरण बदलण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. मोदींच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या २१ दिवसीय कार्यक्रमामध्ये १४ कोटी रेशनच्या पिशव्या, ५ कोटी थँक यू मोदीजी पोस्ट कार्ड, नदी स्वच्छता मोहिमेअंतर्गत ७१ जागांवर केलं जाणार काम, सोशल मीडियावरील कॅम्पेनसोबतच करोना लसीकरण आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जीवनावर आणि कार्याची माहिती देणाऱ्या सेमिनार्सचं आयोजन करण्यात येणार आहे. मोदींच्या वाढदिवसानिमित्त भाजपाने आयोजित केलेल्या कार्यक्रमांची यादी वाचुया…
> नमो अॅपवरुन व्हर्चूअल प्रदर्शन भरवण्यात येणार.
> पीएम गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत गरीबांना १४ कोटी रेशनच्या पिशव्यांचं वाटप करण्यात येणार. हा कार्यक्रम मोठ्या स्तरावर आयोजित करण्यात येणार असून यामध्ये पक्षाचे सर्व पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी वितरण केंद्रावर जाऊन सहभागी होतील.
> पक्षाचे कार्यकर्ते रक्तदान शिबिरांचे आणि स्वच्छता मोहिमांचे आयोजन करतील
> पक्षाचे नेते, पदाधिकारी आणि लोकप्रितनिधींना लसीकरण केंद्रांवर जाण्याचे आदेश देण्यात आलेत.
> प्रत्येक विभागामध्ये दिव्यांग व्यक्तींना कृत्रिम अवयव आणि आवश्यक उपकरणांचे वाटप करण्यात येणार आहे. तसेच जिल्हा स्तरावर आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आलं आहे.
> देशातील वेगवेगळ्या बागांमधून पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानणारी पाच कोटी शुभेच्छापत्र पाठवली जाणार.
> २५ सप्टेंबर रोजी दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर आयोजित कर्यक्रमांच्या यादीत एक विशेष कार्यक्रमाचा समावेश करण्यात आलाय.
> गांधी जयंतीच्या पार्श्वभूमीवर खादीच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत.
> नदी स्वच्छता मोहिमेअंतर्गत विशेष कार्यक्रम राबवण्यात येणार आहे. देशभरातील ७१ ठिकाणी नद्या स्वच्छ केल्या जाणार आहेत.
> उत्तर प्रदेशमध्ये ७१ ठिकाणी गंगा स्वच्छता अभियान राबवलं जाणार आहे.

> अनाथ मुलांसाठी भाजपाकडून एक विशेष मोहिम राबवली जाणार आहे. पंडित दीनदयाल उपाध्याय आणि महात्मा गांधींच्या जंयतीनिमित्ती विशे, कार्यक्रम आयोजित करण्याचे निर्देश देण्यात आलेत.
