🛑ऑनलाईन गेमच्या नादात घरफोड्यांची मालिका; अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकला! – तीन घरफोड्यांचा छडा.- पावणेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त.
🟣 जीवन शिक्षण विद्या मंदिर, वडरगे येथे विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप; सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या इंदिरा मोरे यांच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक
🛑ऑनलाईन गेमच्या नादात घरफोड्यांची मालिका; अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकला! – तीन घरफोड्यांचा छडा.- पावणेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त.
गडहिंग्लज प्रतिनिधी.

मोबाईलवरील ऑनलाईन गेमिंग ॲपच्या व्यसनातून चैनीची हौस भागवण्यासाठी सलग तीन घरफोड्या करणाऱ्या युवकाला गडहिंग्लज पोलिसांनी अटक केली आहे. हलकर्णी (ता. गडहिंग्लज) येथील विनायक पांडुरंग चौगुले (वय २१) याला गोपनीय माहितीच्या आधारे ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून सुमारे २ लाख ७० हजार रुपयांचा चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
पोलीस निरीक्षक सतीश होडगर यांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑनलाईन गेमिंग ॲपवर पैसे उधळण्यासाठी आणि चैनीचे जीवन जगण्याच्या हव्यासापोटी संशयिताने घरफोड्यांचा मार्ग स्वीकारला. हलकर्णी गावातील तीन वेगवेगळ्या घरांमध्ये चोरी करून त्याने सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम लंपास केली होती.
३० जूनच्या मध्यरात्री संशयिताने विकास बावचीकर यांच्या घरातून २ लाख १० हजार रुपये किमतीचे सोन्याचे चार दागिने, विष्णुपंत जारकोळी यांच्या घरातून ४८ हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने, तसेच दुंडप्पा चिगरी यांच्या घरातून १२ हजार रुपये रोख अशी एकूण २ लाख ७० हजार रुपयांची चोरी केली होती.
या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण, गोपनीय माहिती आणि स्थानिक तपासाच्या आधारे संशयिताला जेरबंद केले. त्याच्याकडून चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले.
ही कारवाई पीएसआय रमेश मोरे, पोलीस कर्मचारी रोहिदास नांगरे, किल्लेदार, प्रियांका इंगवले आणि सचिन शिंदे यांच्या पथकाने केली.
🟣 जीवन शिक्षण विद्या मंदिर, वडरगे येथे विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप; सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या इंदिरा मोरे यांच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक.
गडहिंग्लज.- प्रतिनिधी

नवीन शैक्षणिक वर्षाच्या पार्श्वभूमीवर जीवन शिक्षण विद्या मंदिर, वडरगे येथे विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. आदर्श महिला बचत गटाच्या अध्यक्षा इंदिरा नितीन मोरे व ग्रामपंचायत सदस्य महादेव मोरे यांच्या पुढाकारातून विद्यार्थ्यांना पेन, वह्या, पेन्सिल, खोडरबर, शार्पनर आदी आवश्यक शैक्षणिक साहित्याचे मोफत वितरण करण्यात आले.
विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन देणाऱ्या या उपक्रमाचे ग्रामस्थ, पालक व शिक्षणप्रेमी नागरिकांकडून मनापासून स्वागत करण्यात आले. या सामाजिक बांधिलकीची दखल घेत शाळा व्यवस्थापन समिती व शिक्षकवृंदाच्या वतीने अध्यक्षा इंदिरा मोरे यांचा सत्कार करण्यात आला.
विशेष म्हणजे, हा उपक्रम केवळ एकदाच नव्हे तर दरवर्षी सातत्याने राबविला जातो. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हेच ध्येय ठेवून इंदिरा मोरे व महादेव मोरे यांच्या माध्यमातून आरोग्य शिबिरे, क्रीडा साहित्य वाटप, प्रबोधनपर मराठी चित्रपटांचे प्रदर्शन, शाळा परिसरात वृक्षारोपण, वनभोजन, हस्ताक्षर सुधारणा शिबीर, इंग्लिश स्पिकिंग शिबीर, मोटिवेशन शिबीर अशा विविध उपक्रमांचे नियमित आयोजन केले जाते. त्यामुळे गावातील शाळेला नवसंजीवनी मिळत असून विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाविषयी सकारात्मक वातावरण निर्माण होत आहे.
यावेळी बोलताना अध्यक्षा इंदिरा मोरे म्हणाल्या, आपल्या गावची शाळा ही आपलीच जबाबदारी आहे. सामाजिक कर्तव्य म्हणून आम्ही दरवर्षी विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबवत असतो. यंदाच्या वर्षाची सुरुवात शालेय साहित्य वाटपाने केली असून पुढील काळातही अनेक नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्याचा आमचा संकल्प आहे. घटत चाललेली पटसंख्या वाढविण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत प्रेरणादायी वातावरण मिळावे यासाठी सातत्याने प्रयत्न करणार आहोत. वडरगेची शाळा तालुक्यातील आदर्श शाळा म्हणून ओळख निर्माण करेल, यासाठी आम्ही कायम शाळेच्या पाठीशी ठामपणे उभे राहू.
या कार्यक्रमास प्राथमिक विद्यामंदिर वडरगेचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सदस्य, आदर्श महिला बचत गटाचे पदाधिकारी व सदस्य, ग्रामस्थ तसेच महादेव मोरे यांचा मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता.
विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षण, संस्कार आणि सामाजिक जबाबदारी यांचा सुंदर संगम घडविणाऱ्या इंदिरा मोरे यांच्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून विशेष कौतुक होत आहे.

