अखेर मॉन्सून केरळमध्ये दाखल.- कोकणात पावसाचा इशारा.- १० जूननंतर मात्र मान्सूनची पुढील वाटचाल संथ राहण्याची शक्यता.- हवामान अंदाज – अधिक माहिती पहा.. पावसाचा अंदाज घेऊनच पेरण्या कराव्यात
मुंबईः- प्रतिनिधी.
सर्वांकरिता आनंदाची बातमी आहे. अखेर मोठ्या प्रतिक्षेनंतर केरळमध्ये मॉन्सून दाखल झाला आहे. याबाबत बोलताना हवामान विभागाचे तज्ञ प्रवीण कुमार यांनी म्हटले की, मॉन्सून केरळमध्ये दाखल झाला आहे. पुढील 48 तासांत दक्षिण महाराष्ट्र त्यामध्ये कोकणमधील भाग तिथे पावसाचा अंदाज आहे, असं प्रवीण कुमार यांनी सांगितले. दक्षिण महाराष्ट्रात पुढच्या काही दिवसात मान्सून दाखल होईल. उद्या संध्याकाळपर्यंत केरळचा बराचसा भाग हा मान्सूनने व्यापलेला असेल. पुढील ३ ते ४ दिवसांत मान्सूनने कर्नाटकच्या किनारपट्टीवरून पुढे सरकेल. गोव्याच्या अक्षांशापर्यंत मजल मारण्यासाठी अनुकूल परिस्थिती असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे १० जूनपर्यंत तळकोकणातही तो दाखल होण्याची शक्यता आहे.
१० जूननंतर मात्र मान्सूनची पुढील वाटचाल संथ राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात मान्सूनचा पाऊस पोहोचण्यासाठी 20 जून उजाडण्याची शक्यता आहे. पावसाचा अंदाज घेऊनच पेरण्या कराव्यात असं आवाहन शेतकऱ्यांना करण्यात आलं आहे. मुंबई पुण्यात साधारणपणे १० ते १५ जून दरम्यान मान्सूनचा पाऊस येण्याची शक्यता आहे. विदर्भात 15 जून नंतरच मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. पुढचे 2 ते 3 दिवस विदर्भातील काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट असून जोरदार वाऱ्यासह हलक्या पावसाचा अंदाज आहे. विदर्भातील जिल्ह्यात ढगाळ वातावरण असलं तरी सध्या असच तापमान कायम असेल, 40 ते 42 डिग्री पर्यंत उन्हाचा पारा असेल. विदर्भात पुढील काही दिवस वादळीवाऱ्याचा मध्यमस्वरूपाचा पाऊस होईल. मात्र, आता येणारा पाऊस हा अवकाळीच असेल कारण मान्सूनच्या अनुषंगाने अजून विदर्भात अनुकुल वातावरण निर्माण व्हायचे आहे. विदर्भासह राज्यात 15 जूनच्या आसपास मॉन्सून दाखल होईल. वर्धा, चंद्रपूर, यवतमाळ या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मध्यम स्वरूपाच पाऊस आणि वादळी वारा असणार आहे. पण अवकाळी पाऊस असेल, हा मान्सून पूर्व पाऊस नसेल. विदर्भाला मान्सूनसाठी अजून प्रतिक्षा कायम असणार आहे… मात्र 10 जून नंतर परिस्थितीच्या अनुषंगाने याचा अंदाज घेता येईल.



