हाळोली फाट्यावर भरधाव कारचा थरार, 4 जण जखमी : चालकावर गुन्हा दाखल.
आजरा (प्रतिनिधी)

आंबोली-आजरा मार्गावर हाळोली फाटा येथे रविवारी स. 8.15 वा. भरधाव हुंदाई क्रेटा कारने बसची वाट पाहत थांबलेल्या प्रवाशांना उडवले. या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील चार जण गंभीर जखमी झाले असून, कार चालकावर आजरा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हैदराबाद येथील चालक भरतराज सुब्रमण्यम हा MH 14 HD 2761 क्रमांकाची क्रेटा कार भरधाव वेगाने चालवत आंबोलीकडून येत होता. हाळोली फाटा येथील बस स्टॉपवर सोहाळे, ता. आजरा येथील संजय काळू कांबळे (54), त्यांची पत्नी उषा, मुलगी श्रुतिका व मालुबाई अशोक कांबळे हे आजराकडे जाण्यासाठी बसची वाट पाहत थांबले होते. भरधाव कारने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून थेट या चौघांना धडक दिली.
धडक इतकी जोरात होती की चौघेही गंभीर जखमी झाले. तसेच सरिता हॉटेल जवळ उभी असलेली MH 09 FZ 0776 क्रमांकाची मोटारसायकलचेही नुकसान झाले. अपघातानंतर स्थानिकांनी तत्काळ मदत करून सर्व जखमींना गडहिंग्लज येथील हत्तरकी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
याप्रकरणी फिर्यादी संजय कांबळे यांच्या जबाबावरून आजरा पोलीस ठाण्यात गु.र.नं. 134/2026 नुसार भा.न्या.सं. कलम 281, 125(अ), 125(ब), 324(4) व मो.व्हे.ॲक्ट 184 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास पोहेकॉं 655 शिकलगार करत आहेत. गुन्हा दाखल करणारे अंमलदार पो.हे.कॉं 551 कांबळे आहेत.




