निसर्गाचा बळी महामार्गाच्या नावावर.- २ लाख – पर्यावरण संवर्धनाच्या नावाखाली कंत्राटदारांचा फक्त ‘फार्स’?
उष्णतेची लाट रस्त्याच्या कडेला वाळवंट.
मुंबई :- प्रतिनिधी.
मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी शासनाकडून असलेली तब्बल १ लाख १५ हजार ६१६ झाडांची कत्तल करण्यात आली. या महाभयंकर वृक्षतोडीची भरपाई म्हणून महामार्ग विभागाने परशुराम ते झारप दरम्यान १ लाख ९६ हजार ११२ वृक्ष लावल्याचा छातीठोक दावा केला होता. मात्र, प्रशासनाचा हा दावा पूर्णपणे फोल ठरला असून प्रत्यक्षात यातील बहुतांश झाडे सुकलेल्या किंवा मृत अवस्थेत आहेत ! जिवंत झाडांची संख्या हाताच्या बोटावर मोजण्याइतकीच उरल्याने कंत्राटदारांच्या निष्काळजीपणाविरोधात नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. याबाबत अलीकडे झालेले महाराष्ट्रातील सर्व राष्ट्रीय महामार्गावर अशीच परिस्थिती आहे. रस्त्याकडेला नव्याने लावलेली वृक्ष पाणी नसल्यामुळे व उन्हाच्या तडाख्याने सुखून पडली आहेत.
नागरिक, पर्यावरणप्रेमी आणि सामाजिक संघटनांनी सातत्याने आवाज उठवल्यानंतर अखेर राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या रत्नागिरी कार्यालयाने आकडेवारी जाहीर केली. या अधिकृत माहितीनुसार एकूण वृक्षलागवडः १,९६,११२ झाडे (महामार्गाच्या दुतर्फा ९०,२३५ आणि दुभाजकांमध्ये १,०५,८७७ झाडे). कागदावर लाखो झाडे लावली गेली असली, तरी प्रत्यक्षात देखभालीअभावी त्यांचे वाळवंट झाले आहे. झाडांचे संगोपन न करता केवळ कंत्राटदारांचे खिसे भरण्याचे काम सुरू असल्याचा आरोप आता होऊ लागला आहे. कोकणच्या वातावरणाशी सुसंगत असणाऱ्या स्थानिक वृक्षांचीच लागवड करण्यात यावी, यासाठी चिपळूणमध्ये वृक्षप्रेमींनी तीव्र आंदोलन केले होते. मात्र, प्रशासनाने या आंदोलनाकडे साफ दुर्लक्ष केले.
देखभालीच्या नावाने ‘शून्य’ कारभार असल्याने कोट्यवधी रुपये खर्च करूनही झाडे जगू शकली नाहीत. चौफेर होणाऱ्या टीकेनंतर आता महामार्ग विभागाने सारवासारव सुरू केली आहे. मृत झाडांच्या जागी आगामी पावसाळ्याच्या मध्यापर्यंत पुनर्लागवड पूर्ण करण्याचे आश्वासन विभागाने दिले आहे. कंत्राटदारांना नवीन खड्डे खोदण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दुभाजकांमध्ये साचलेला डांबरी व काँक्रीटचा राडारोडा हटवून तिथे सुपीक माती टाकण्याच्या सूचना केल्या आहेत. टँकरद्वारे नियमित पाणीपुरवठा करणे आणि गवत साफ करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. लाखो झाडे मारल्यानंतर आता नव्या झाडांचे कंत्राटदार रक्षण करणार की पुन्हा तिजोरीची लूट होणार, याकडे संपूर्ण कोकणासह महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.




