सहकार भारती उत्कृष्ट पुरस्काराने जनता सहकारी गृहतारण संस्था सन्मानित.
आजरा.- प्रतिनिधी.
माणसं जोडणारी संस्था म्हणून ओळख असलेल्या जनता सहकारी गृहतारण संस्थेने सहकार क्षेत्रात काम करत असतानाच सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम सातत्याने केलेला आहे “आयएसओ मानांकन महाराष्ट्र राज्य कार्यक्षेत्र” याबरोबरच संस्थेने रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण केले आहे. शिवाय शंभर कोटी ठेवींचा टप्पा ही पूर्ण केलेला आहे. संस्थेच्या आजपर्यंतच्या या कामाची दखल घेऊन सहकार भारतीच्या वतीने संस्थेला “सहकार भारती उत्कृष्ट संस्था” पुरस्कार सहकार भारतीचे “राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर उदय जोशी” यांच्या हस्ते जयसिंगपूर येथे झालेल्या कार्यक्रमात प्रदान करण्यात आला. आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष २०२५ च्या निमित्ताने मिळालेला हा पुरस्कार संस्थेच्या वाटचालीतील एक सोनेरी पान आहे. यामुळे संस्थेची सहकार क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण झाली आहे.

घर बांधणी, फ्लॅट खरेदीसाठी दीड कोटी पर्यंत आणि प्लॉट खरेदीसाठी एक कोटी पर्यंत कर्ज, सोनेतारण कर्ज, ठेवतारण कर्ज, वीजबिल भरणा केंद्र त्याचबरोबर रौप्य महोत्सवाच्या निमित्ताने वेगवेगळया आकर्षक ठेव योजना सुरू करत संस्थेने सभासदांचा विश्वास संपादन केलेला आहे. संस्थेच्या सर्वच सात शाखांमध्ये या सेवा सभासदांसाठी उपलब्ध आहेत. विनम्र आणि तत्पर सेवेचा वसा घेत संस्थेने आजपर्यंतची वाटचाल पूर्ण केली आहे. संस्थेच्या या कार्याची दखल घेऊन सहकार भारतीच्या वतीने हा पुरस्कार देण्यात आला. यावेळी सहकार भारतीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर उदय जोशी, महाराष्ट्र प्रदेशचे महामंत्री विवेक जुगादे, यांच्या हस्ते जयसिंगपूरचे नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर, सौ. वैशालीताई आवाडे, जिल्हाध्यक्ष अरविंद मजलेकर, श्रीकांत चौगले यांचे उपस्थितीत हा सन्मान करण्यात आला. संस्थेच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष मारूती मोरे, संचालक व गारगोटी शाखा चेअरमन आनंद चव्हाण, इचलकंरजी शाखा चेअरमन प्रकाश शिंदे, संचालक महादेव मोरुस्कर जनरल मॅनेजर मधुकर खवरे व अनिरुध्द कुंभार आदी उपस्थित होते.
